महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत नगरसेवक आक्रमक : आयुक्तांनी दिल्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
बेळगाव : मान्सूनपूर्व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत विरोधी गटाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. शिवाय बैठक सुरू होताच विद्यमान नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नालेसफाई अर्धवट स्थितीत असल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामुळे बैठकीच्या शेवटपर्यंत या ना त्या कारणाने नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत राहिल्या. दरम्यान आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, कौन्सिल सेक्रेटरी गुरुसिद्ध हिरेमठ, उपमहापौर रेश्मा पाटील उपस्थित होते. या बैठकीत शहरात सुरू असणारी नालेसफाई, स्वच्छता व इतर विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कपिलेश्वर कॉलनी येथील नाल्याची स्वच्छता मागील चार वर्षांपासून करण्यात आली नसल्याची तक्रार मांडण्यात आली. कच्च्या नाल्याची सफाई सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाते तर पक्क्या नाल्याची सफाई आरोग्य विभागाकडून केली जात असून लवकरच सफाई केली जाईल, असे उत्तर देण्यात आले. शिवाजी उद्यान येथील पथदीप मागील महिन्यापासून बंद आहेत. हिंदवाडी येथील नालेसफाई झाली नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांनी केली. अमननगर, मारुतीनगर, गांधीनगर, कोनवाळ गल्ली येथील नाल्यांची सफाई झाली नसल्याने पावसाळ्यात सांडपाण्याची समस्या गंभीर बनण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मनपा अधिकारी नगरसेवकांना विश्वासात न घेता काही ठिकाणी काम करत असल्याची तक्रार करण्यात आली. यावर महापौरांनी उत्तर देताना सांगितले, कोणत्याही अधिकाऱ्याने वॉर्डमध्ये जाताना संबंधित नगरसेवकाला कल्पना द्यावी. तसेच नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन ताबडतोब ती समस्या सोडवावी.
निपाणीकर-धोत्रे यांच्यात शाब्दिक चकमक
जून महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी अद्याप शहरातील नालेसफाई झाली नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. नगरसेवक रवी धोत्रे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजी- पणाचा पाढाच वाचला. यामुळे शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व नगरसेवक रवी धोत्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.