जुन्या कार विक्रीसह ई-कॉमर्सचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गाडी भाडय़ाने देण्याच्या व्यवसायातील ओला कंपनीने आपले दोन व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सेकंड हँड कार्स विक्री संबंधित व्यवसाय व ई-कॉमर्सचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळामध्ये कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायावर जास्तीत जास्त लक्ष देणार आहे.
ओलाने युज्ड कारचा आपला व्यवसाय बंद करण्याचे ठरविले आहे. यासोबतच इन्स्टंट ई कॉमर्सशी संबंधित ओला डॅश हा व्यवसायही बंद करण्याचा निर्णय ओलाने घेतला आहे. याचाच अर्थ ई-कॉमर्सचा व्यवसाय आता ओला यापुढे ओला कंपनी करणार नाही हे यावरून स्पष्ट होते.
का व्यवसाय केले बंद ?
ओला कंपनीच्या कॅब सर्व्हिसला मोठय़ा प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असून हा व्यवसाय कंपनीचा चांगला नफा मिळवून देत असल्याची बाबही समोर आली आहे. कंपनीला आगामी काळामध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांमध्ये क्रांती करायची आहे. त्यासाठी आवश्यक ती योजना बनविली जात आहे. इलेक्ट्रिक कार निर्मितीसह, बॅटरी निर्मिती आणि वित्तसेवा देण्याचेही प्रयोजन ओलाने केले आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युज्ड कार सेवेचा प्रारंभ केला होता. ही सेवा स्पिनी, ड्रुम, कार्स 24 आणि ओएलक्स यांना टक्कर देत होती.