भारतीय संस्कृती, वेद, हजारो वर्षे कशी आणि का टिकली असेल याचं उत्तर शोधायचे असेल तर या खडतर, उत्तुंग, हिमालयाच्या कुशीतल्या तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायलाच हव्यात. जन्म, मृत्यू, पाप, पुण्य, धर्म, अधर्म या सगळय़ाची जपणूक आमच्या ऋषिमुनीनी कशी केली असेल याची चालतीबोलती उदाहरणे या स्थानांच्या ठिकाणी पहायला मिळतात. तरीही हे साधू आत्महत्या करतात असा एक प्रवाद ऐकायला मिळतो.
‘अतिथी देवो भव’ म्हणणारी आणि त्यानुसार आचरण करणारी माणसं ज्या भूमीत आहेत तिथे मृत्यूलाच मारून चिरंजीव होणारी, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी माणसंच खऱया अर्थाने जगताना दिसतात. नाहीतर स्वतःच्या स्वार्थासाठी युद्ध करून प्रजेची राख रांगोळी करून जगणारे मेल्याहून मेलेले असतात.
आमच्या हिंदू संस्कृतीत धर्म रक्षणासाठी पोरं, बाळं, घरदार, धनदौलत अगदी प्राण देखील देणारे हजारो लोक दाखवता येतील. आम्ही विकसित देशापेक्षा गरीब, दुबळे असलो तरी या वैदिक अमृताचे वारसदारही आहोत. हे भाग्य जगातल्या कोणत्याच साम्राज्यलोलूप समाजाला लाभले नाही. आमची संस्कृतीच इतकी मजबूत आहे की आम्ही परकीय दबावाखाली जगलो तरी आज सुखाने स्वातंत्र्यात जगतोय. आध्यात्मिक व भौतीक जगण्याची सांगड घालत भगवंताच्या शोधाला तीर्थक्षेत्री रमतोय.
हे सगळेच सांगायचे कारण म्हणजे बद्रीनाथाच्या पुढे असलेले स्वर्गारोहणाचे स्थान, आत्म समर्पण करण्याची जागा. जिथे मृत्यूलाच मारून अमर होणारे अनेक योगी भेटतात, दिसतात. त्याचं कारण म्हणजे या भागीरथीत आत्मविसर्जन केले की नश्वर देहसुद्धा अमर होतो हे सांगणारी आमची संस्कृती. आमच्या आर्यांना याची खात्रीच असल्याने सहजपणे मृत्यूला कवटाळून अमर होणारे किंवा पुन्हा पुन्हा जन्माला येणारे भक्त अशा ठिकाणीच येतात.
जय बद्रिनाथ, जय विशाल बद्री…..अशा जयघोषात निघालेले यात्रेकरू अतिशय कष्टाने पहाडी मार्ग चढत असलेले दिसतात. रस्त्यावर कोठे सावली नाही की अडोसा, प्यायला पाणी नाही, खायचा प्रश्नच नाही. अतिशय कडाक्मयाच्या थंडीत एखादं काबळं जेमतेम घेऊन अनवाणी पायाने, भगवंताच्या ओढीने निघालेले हे पांथस्थ, कुठल्या तरी अंतरीक चैतन्याने ओसंडलेले असतात. इथे कोणी लहान नाही मोठा नाही, तहान भुकेची जाणीव नाही. फक्त भगवंत नि÷ा, एकाग्रता, देवदर्शनाची पिपासा, भक्तीने हेलावलेलं हृदय, एका अनामिक ओढीने चालणारे पाय ….आणि निरव शांततेत उमटणारा जयघोष…..जय विशाल बद्री, जय केदारनाथ…..
विष्णु आणि शिवाची उराउरी भेट होणं म्हणजे काय ते या भाविकांच्या उत्स्फूर्त जयघोषातून जाणवतं. इथे तिर्थयात्रेचे नेमके महात्म्य उलगडते. आपल्या पूर्वजांनी आखून दिलेली वर्णाश्रम व्यवस्था या यात्रेने वानप्रस्थाश्रमात आणून सोडते, सगळय़ा मोहमाया, आसक्तीपासून दूर नेऊन सोडते. त्याग, वैराग्य, भक्ती व तपश्चर्येच्या मार्गावर आपण केव्हा चालायला लागतो ते कळतच नाही. निसर्गाचे मौन इथे ऐकायला सुरवात होते. हृदयाच्या स्पंदनालासुद्धा ओंकाराची लय असते याची अनुभूती येते. माणसाची विषय लोलूपता दैवी गुणांनी उजळून निघते.अतिशय दुर्गम असे डोंगर-दऱया कशा भाविकांमुळे नितांत सुंदर भासायला लागतात. अशा सगळय़ाच यात्रेकरूंमुळे भक्तीची गंगा हजारो वर्ष अव्याहत वाहतेय हे मात्र खरंय……जय बद्रिनाथ, जय केदारनाथ…जय हो.