बळीराजाच्या आशा पल्लवित : पिकांना दिलासा : मात्र मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षाच
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वरुणराजाच्या आगमनाने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस सुरू झाला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांना थोडासा त्रास सहन करावा लागला तरी पाऊस हवाच अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. त्याचबरोबर जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. नद्यांनीही तळ गाठला आहे. नाले कोरडे पडत आहेत. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या पावसामुळे बहुसंख्य पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दमदार पाऊस झाला तरच पाणीटंचाई दूर होणार आहे.
सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी काही भागात सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारी पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून सरी कोसळत होत्या. सायंकाळी पाचच्या दरम्यान दमदार सरी कोसळल्या त्यामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली होती. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. त्याचवेळी पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे भाविकांना छत्रीचा आधार घेत खरेदी करावी लागली. या पावसामुळे बाजारपेठेत दलदल निर्माण झाली होती. काही ठिकाणी चिखलही झाला होता. त्यामधून वाट काढून भाविक खरेदी करत होते. या पावसामुळे काहीवेळ हवेत गारवा निर्माण झाला होता. अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत होता. त्यामुळे पाऊस येताच अडोसा शोधण्यासाठी सारेच धडपड करत होते. या पावसामुळे भात पोसवणीला फायदा होणार आहे. लव्ह्या जातीच्या भातांना हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र मोठ्या जातीच्या भातांना अजूनही दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे. या पावसामुळे सद्या दिलासा मिळाला तरी मोठ्या पावसाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून आहेत.
गणेशमूर्तींना घालावे लागले प्लास्टिक
मंगळवारी गणेशोत्सव असला तरी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवारी गणेशमूर्ती मंडपामध्ये आणून ठेवत होते. याचबरोबर काही घरगुती गणेशमूर्तीही भाविक सोमवारीच नेत होते. त्यामुळे त्यांना या पावसापासून संरक्षण करण्यासाठी गणेशमूर्तींना प्लास्टिक घालावे लागले. भक्तांनाही या पावसाचा त्रास सहन करावा लागला होता.