डिचोली तालुक्यातील सर्व फार्म, जलक्रीडा केंद्रे फुल्ल. मोठ्या संख्येने पालकांनी लुटला अखेरच्या रविवारचा आनंद. सोमवारपासून पालकांची ड्युटी सुरू
डिचोली : मुलांना शाळा हायस्कुलांना सुट्टी म्हणजेच पालकांसाठीही काही दिवसांचा दिलासा असतो. या सुट्टीच्या काळात कुटुंबाला घेऊन विविध ठिकाणी टुर तसेच सहलीचा बेत पालक आखत असतात. आणि फिरूनही येतात. मुलांच्या शाळा हायस्कुलांच्या तारखा जवळ येत असतात त्याप्रमाणे या मौजमजेचे प्रकारही बरेच वाढतात. गेला रविवार (दि. 4 जून) हा यावर्षीचे शालेश वर्ष सुरू होण्यापूर्वीचा अखेरचा सुट्टीचा रविवार होता. त्यामुळे डिचोली तालुक्यातील तरी सर्व फार्म जल क्रिडा केंद्रे फुल्ल झाले होते. तसेच अनेकांनी कुटुंबियांसह समुद्रस्नानाचा तसेच नदी, झरी अशा जलस्रोतांवरही निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालवला. गेला रविवार हा उन्हाळी सुट्टीचा अखेरचा रविवार असल्याने बहुतेक सर्वच पालकांनी आपल्या मुलांसमवेत मौजमजा करत त्यांना वेळ दिला. मुलांबरोबर दिवस घालवाताना स्वत:ही मौजमजा केली. पालकांच्या साथीने मुलांनीही धम्माल आनंद लुटला. डिचोली तालुक्यात व परिसरच्या भागात अनेक ठिकाणी असलेल्या फार्मवर लोकांनी गर्दी केली होती. सोमवारपासून सुरू होण्राया मुलांच्या शाळा हायस्कुलांमुळे पुन्हा पालकांची ड्युटी सुरू होणार असल्याने पालकांनी स्वत:ही आनंद लुटला आणि मुलांनाही या आनंदात तृप्त केले. सध्या राज्यात लहान मुले, युवा युवती, वृध्दांसाठीही फार्मवरील लहान मोठ्या स्विमिंग पुलमध्ये डुंबून राहून मजा लुटणे सुरक्षित बनले आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात फार्म संस्कृतीला चांगले दिवस आलेले आहेत. अनेक फार्म्सवर रात्रीच्या वेळी वास्तव्य करण्यासाठी खोल्यांचीही व्यवस्था असल्याने लोक दोन दिवसांचा बेत ठरवून तो अंमलात आणतात. अशाच प्रकारे दर शनिवार व रविवारी या फर्म्सवर अफाट गर्दी पहायला मिळत होती.
गेल्या दोन आठवड्यातील शनिवार व रविवारी या सर्व फार्म्सवर लोकांची मोठी गर्दी होती. गेल्या शनि. दि. 3 व रवि. दि. 4 जून रोजी तर डिचोली तालुक्यातील जवळपास सर्वच फार्म्स लोकांच्या उपस्थितीत फुल्ल झाले होते. काही फार्मवर तर आगाऊ बुकींग नसल्याने ग्राहकांना माघारी पाठविण्याचीही पाळी फार्म मालक चालकांवर आली. मोठ्या संख्येने राज्यभरातील पालक आपल्या मुलांना घेऊन फार्मवर सहलीसाठी बाहेर पडले होते. हा रविवार विशेष सहलींसाठीच असा सर्वांनी आरक्षित करून ठेवला होता. त्यामुळे थड हवेच्या ठिकाणी नदी नैसर्गिक झरी, तलावांच्या ठिकाणीही लोकांची बरीच गर्दी होती. महाराष्ट्र येथून गोव्यात दाखल झालेल्या तिळारी कालव्याच्या पाण्यात अनेकजण मौजमजा करतात. कालव्याच्या काठावर स्वयंपाक करून ताज्या जेवणाचा आस्वाद घेण्याचाही लोक लुटतात. त्याचप्रमाणे लोकांनी या तिळारी कालव्याच्या ठिकाणीही गर्दी केली होती. फार्म्स व नैसर्गिक जलस्रोतांबरोबरच समुद्रस्थानासाठीही लोकांनी आपल्या मुलाबाळांसह मोर्चा वळविला होता. पावसाळ्यापूर्वीच्या हा अखेरचा रविवार असल्याने समुद्रांवरही लोकांनी बराच वेळ आंघोळ करत मजा लुटली. काही भागांमध्ये तर मानसींवरही लोकांनी गर्दी केली होती. सुट्टीच्या दिवसांमध्ये लोक मौजमजा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने फार्मवर येत असतात. गेल्या मे महिन्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार तर या जूनच्या शनिवार व रविवारी लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे काहींना नाईलाजास्तव माघारीही पाठवावे लागले. लहान मुलांसह मोठ्यांनीही शाळा हायस्कुल सुरू होण्यापूर्वी या फार्म्सवर बरीच मजा लुटली, असे डिचोली तालुक्यातील एका फार्मचे मालक बंटी गावकर यांनी सांगितले.