लांजा प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटातील तीव्र उतारावर शुक्रवारी गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा अवजड कंटेनर उलटला.त्यामुळे वेरळ घाटात महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास ठप्प पडली होती.महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हाच कंटेनर वेरळ घाटात 3 ऑक्टोबर 2021 मध्येही कलंडला होता. त्यावेळीही तब्बल 4 तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. दोन क्रेनच्या सहाय्याने ट्रेलरला बाजूला करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा याच ठिकाणी हा कंटेनर पुन्हा कलंडला. वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर महामार्गाच्या मध्यभागी कलंडलेल्या कंटेनरला बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. वेरळ घाट व येथील यु आकाराचे अवघड वळण अवजड वाहनांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे.
वेरळ घाटात 14 वेळा कंटेनरचे अपघात घडण्याच्या घटना घडल्या आहेत. गोवा ते मुंबई असा कंटेनर (एमएच 43, बीबी 9234) निघाला होता. शुक्रवारी दुपारी 12 च्या दरम्यान कंटेनर महामार्गावरील वेरळ घाटामध्ये आला असता घाटातील तीव्र उतारावरील यु आकाराच्या वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर घाटात महामार्गच्या मध्यभागी कलंडला. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर 1 ते 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गोवा व मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प पडली होती.क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी उशिरापर्यंत कंटेनर हटवण्याचे काम सुरु होते.कलंडलेल्या कंटेनरच्या एका बाजूने दुचाकी व चारचाकी लहान वाहनांना वाहतूक खुली करुन देण्यात आली. लांजा व हातखंबा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.