शैक्षणिक योगदानाबद्दल गुरुजनांचा केला गौरव
आचरा प्रतिनिधी
”भारत माता की जय, हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे अमर रहे” आदी घोषणांनी संपूर्ण पिरावाडी परिसर दूमदूमून गेला होता. निमित्त होते क्रांती दिनानिमित्त देशासाठी हौतात्म्य देणाऱ्या क्रांतीविरांना मशाल फेरीद्वारे अभिवादन करण्याचे. आचरा पिरावाडी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे आणि इतर तेरा हुतात्म्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा या हेतूने पिरावाडी येथे मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीचा शुभारंभ प्राथमिक शाळा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या पुतळ्यास आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
यावेळी पिरावाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन कुबल, ग्रामोन्नति मंडळाचे अध्यक्ष नारायण कुबल डॉ प्रमोद कोळंबकर,अनिल करंजे,मंदार खोबरेकर,वैभव कुमठेकर, पाडूरंग कोचरेकर,गणेश कोयंडे, मंदार सरजोशी,,नित्यानंद तळवडकर,मुझफ्फर मुजावर,तातू कुबल यांसह अन्य मान्यवर तसेच पिरावाडी ग्रामस्थ विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
.
सदर मशाल फेरी हुतात्मा कोयंडे यांच्या निवासस्थानी भेट देवून प्रतिमेला वंदन करत संपूर्ण पिरावाडी मध्ये फेरी मारण्यात आली. यानंतर चव्हाटा येथील पवित्र स्थानी आल्यावर घेण्यात आलेल्या सभेत पिरावाडी शाळेमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेल्या आजी माजी मुख्याध्यापक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.यात अण्णासाहेब कदम,शिवाजी माळी, बुगडे, प्राथमिकच्या निता पांगे,सुर्यकांत पराडकर, मुरलीधर धुरत,सुभाष नाटेकर,अंगणवाडी सेविका रसिका धुरी आदींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या औचित्यावर आर के. फाऊंडेशन सदलगा चिकोडी यांच्या तर्फे पिरावाडी येथील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.