मुस्लिमबांधवांची वाळपई पोलीस स्थानकात धाव :
प्रतिनिधी/ वाळपई
मुस्लिम धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुकवर पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी मासोर्डे येथील किशन नाईक या तऊणाला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लीम धर्माच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी मुस्लिमबांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांनी वाळपईच्या पोलीस स्थानकावर या संदर्भात धाव घेऊन या संदर्भात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. याचा सखोल तपास करण्याची मागणी मुस्लिमबांधवांनी केली होती. त्याची दखल घेऊन वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांनी तपास सुरू केला असता किशन नाईक, रा. मासोर्डे याने सदर पोस्ट फेसबुकवर प्रसारित केल्याचे उघड झाले. या प्रकरणी संशयितावर कारवाई अटक करून त्याची जामिनावर सुटका केली आहे.
मुस्लिमबांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न!
दरम्यान, अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले की, मुस्लीम धर्माविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर संध्याकाळी मुस्लीम बांधवांनी वाळपई पोलीस स्थानकावर धाव घेऊन या प्रकरणाचा त्वरित तपास करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली असता मासोर्डे येथील किशन नाईक याचा यामध्ये हात असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक नितीन वाल्सन, डिचोली पोलीस उपाधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलीस निरीक्षक दिनेश गाडेकर अधिक तपास करीत आहेत.