आज देशभर राष्ट्रव्यापी स्वच्छता मोहीम : उद्या होणाऱ्या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय रविवार, 1 ऑक्टोबर रोजी देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात व्यापक स्वच्छता मोहीम राबवणार आहे. सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ’ ही मोहीम केवळ स्वच्छतेच्या उपक्रमांना समर्पित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केली आहे. त्यानुसार बाजारपेठ, रेल्वेमार्ग, जलकुंभ, पर्यटन स्थळांसह सर्व सार्वजनिक ठिकाणी ही व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरी आणि ग्रामीण भारतातील 6.4 लाखांहून अधिक ठिकाणे श्र्रमदानासाठी निश्चित करण्यात आली आहेत. या मोठ्या स्वच्छता मोहिमेचा उद्देश असुरक्षित ठिकाणे, रेल्वेट्रॅक आणि स्थानके, विमानतळ आणि आजूबाजूचा परिसर, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, जलकुंभ, घाट, झोपडपट्ट्या, बाजारपेठा, प्रार्थनास्थळे, पर्यटनस्थळे यातील कचरा दूर करणे हा आहे. स्वच्छतेसाठी श्र्रमदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता एका महत्त्वाच्या स्वच्छतेच्या उपक्रमासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी असून त्यासाठीचा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी गेल्या आठवड्यातील ‘मन की बात’मध्ये म्हटले होते.
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत यापूर्वी लोकांना जागऊक केले होते. आताही शालेय विद्यार्थी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहेत. या मोहिमेत देशभरातील शाळा पंतप्रधानांच्या सोबत असून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हे अभियान यशस्वी करतील, अशी अपेक्षा आहे. तसेच एनजीओ, बाजार समित्या, व्यापार संघटना, खासगी कंपन्याही या मोठ्या स्वच्छता अभियानासाठी पुढे सरसावल्या आहेत.
लोकांमध्ये उत्साह
‘स्वच्छता मोहीम 2023’ ची थीम कचरामुक्त भारत अशी आहे. सर्व गावे आणि शहरे, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, रेल्वेस्थानके, विमानतळ इत्यादींद्वारे जागरुकता आणि चांगली स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करणारे विविध उपक्रम आयोजित केले गेले आहेत. या उपक्रमाच्या पंधरवड्यादरम्यान 31 कोटींहून अधिक लोकांनी आधीच सक्रियपणे सहभाग घेतला आहे. विविध शहरांमध्ये प्लॉग रन, स्वच्छता रॅली, प्रतिज्ञा, जनजागृती कार्यक्रम, पथनाट्या, रांगोळी स्पर्धा, वॉल आर्ट, बीच क्लीनिंग असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.