ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज लक्ष्मी पूजन असून, हा दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी शेअर बाजार बंद असला, तरी संध्याकाळी लक्ष्मीपूजनानंतर एक तास मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा जवळपास 50 वर्ष जुनी आहे.
हिंदू धर्मानुसार दिवाळीच्या दिवसापासून कोणत्याही गुंतवणुकीची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात. मुहूर्त ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी शेअर बाजारात गणेश-लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजेत शेअर बाजारातील सदस्यांचा सहभाग असतो. त्यानंतर मुहूर्ताचा व्यवहार सुरू होतो.
या शूभ मूहूर्तावर गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करतात. त्यामुळे आज सेन्सेक्स 60000 चा टप्पा पार करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशी असेल मुहूर्त टेडिंगची वेळ
ब्लॉक डील सेशन : संध्याकाळी 5.45 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान.
प्री ओपनिंग सेशन : 6.00 ते 6.08 वाजेपर्यंत.
नॉर्मल मार्केट : संध्याकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत.
कॉल ऑक्शन सेशन : संध्याकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत.
क्लोजिंग सेशन : संध्याकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत.