कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी अधिसूचना जारी : चिन्हे व विविध नियमावली प्रसिद्ध : 30 एप्रिलला मतदान
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी आजपासून मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. सात वॉर्डाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी यापूर्वी आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डने निवडणुकीची नियमावली, चिन्हे व वॉर्डमध्ये येणाऱ्या परिसराची माहिती अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे. अर्ज भरणे प्रक्रिया महिनाभर लांबली असली तरी कॅन्टोन्मेंटकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आगामी काळात कोणत्याही विकासकामांचा शुभारंभ किंवा निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही, अशी सूचना सर्व्हेक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. कॅन्टेन्मेंट बोर्डने ऑक्टोबर महिन्यात मतदारयादी तयार केली होती. पण नाव नोंद न झालेल्या मतदारांना मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी 2 मार्चपर्यंत अर्ज देता येणार आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृह अस्तित्वात असतानाच लॉटरी पद्धतीने सात पैकी दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर वॉर्ड क्रमांक 7 हा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे.
सर्वसामान्यांना तीन हजार शुल्क
उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रिया 24 मार्चपासून सुरू होणार असून, 30 एप्रिल रोजी मतदान आणि 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवारांना विविध जात प्रमाणपत्रासह कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. सर्वसामान्यांना तीन हजार तर मागासवर्गीय उमेदवारांना 1500 रुपये निवडणूक शुल्क भरावे लागेल. निवडणूक आयोगाने कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीसाठी 197 चिन्हे प्रसिद्ध केली आहेत. यापैकी एक चिन्ह उमेदवाराला निवडता येणार आहे. तर विविध वस्तू आणि साहित्याची चिन्हे असून प्राण्यांच्या चिन्हांचा समावेश यामध्ये करण्यात आला नाही. त्यामुळे एसी, कपाट, ऑटो रिक्षा, बेबीवॉकर, फुगे, बांगड्या, बास्केट, बॅट, टॉर्च, नेकलेस, पट्टा, शाळेतील बाक, सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप, बिस्किट, फळा, सुटकेस, विटा, बॉक्स, बकेट, ब्रश, कॅलक्युलेटर, कॅमेरा, ढब्बू मिरची, कारपेट, कोबी, भेंडी, चिक्की, चपाती रोलर, चप्पल अशा विविध चिन्हांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.