वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फोल्डेबल स्मार्टफोन दाखल करण्याच्या स्पर्धेमध्ये आता वन प्लस ही कंपनी देखील उतरली असून त्यांचा नवा फोल्डेबल स्मार्टफोन पुढील महिन्यामध्ये भारतीय बाजारात उतरवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
वन प्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन 19 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने तारीख जाहीर केल्याने नव्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये काय काय वैशिष्ठ्यो असणार याबाबत कुतूहल ग्राहकांमध्ये वाढले आहे. सदरचा स्मार्टफोन हा 8 इंचाच्या अमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. यात स्नॅपडॅगन 8 जन 2 एसओसी प्रोसेसर असण्यासोबत फोन 16 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येईल असेही म्हटले जात आहे.
स्पर्धा वाढणार
सॅमसंगचा अलीकडेच फ्लिप हा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. वन प्लसचा हा पहिलावहिला फोल्डेबल प्रकारातला स्मार्टफोन असणार आहे. या प्रकारात ओप्पोचाही फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आहे. शाओमीचा देखील फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आगामी काळात फोल्डेबल गटातील स्मार्टफोनमध्ये स्पर्धा रंगताना दिसणार आहे.