कोलव्यातून सुरु होते रॅकेट ; दिल्लीतील सात जणांना अटक,हैदराबाद पोलिसांची कारवाई
मडगाव : हैदराबाद पोलिसांनी काल बुधवारी दक्षिण गोव्यातील सेर्नाभाटी – कोलवा येथील बंगल्यावर छापा टाकून बँक ग्राहकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या दिल्लीतील सात जणांच्या टोळीला त्यांच्या सामग्रीसह गजाआड केले. सेर्नाभाटी – कोलवा येथील ‘काईट्स नेस्ट’ बंगल्यावर हा छापा टाकण्यात आला तेव्हा हैदराबाद पोलिसांच्या हाती ही टोळी लागली. या टोळीतील सातही जणांना पोलिसांनी अटक करुन हैदराबादला नेले आहे. प्राप्त माहितीनुसार ही टोळी दिल्लीतील आहे. दिल्लीत बसून या टोळीने हैदराबाद येथील बँक खातेधारकांचे सुमारे 50 लाख रुपये खात्यातून ऑनलाईन पद्धतीने लंपास केले होते.
दिल्ली सोडली, गोवा गाठला
सायबर क्रायम पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा त्यांना लागताच या टोळीने दिल्ली शहर सोडले आणि ती गोव्यात आली. गोव्यातील सेर्नाभाटी हा निर्जन भाग शोधून काढला आणि या सेर्नाभाटी वाड्यावरील बंगला भाड्याने घेऊन तेथून ही टोळी कार्यरत होती. मात्र, हैदराबादच्या सायबर क्राईम पोलिसांनी या टोळीचा माग काढत गोवा गाठला. सेर्नाभाटी परिसर ज्या पोलिसस्थानकाच्या भागात येतो त्या कोलवा पोलिसांना विश्वासात घेऊन सेर्नाभाटी येथील बंगल्यावर छापा टाकून टोळीतील सातहीजणांना गजाआड करण्यात यश मिळविले.
ऑनलाईन बँकिंगमधील गुन्ह्यांत दुपटीने वाढ
कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर लाखो लोकांनी आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यासाठी वेगवेगळी अॅप्स व इतर सोयी आल्या. मात्र, त्याचबरोबर ऑनलाईन बँकिंग गुन्हेही वाढत गेले आणि आता ते दुप्पट झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हैदराबाद शहरात सायबर क्राईम गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दरदिवशी सरासरी 20 तक्रारी येत असतात, अशी माहिती तेथील पोलिसांनी दिली. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार 2019 व 2020 मध्ये ऑनलाईन बँकिंग गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले. या अहवालानुसार 2019 मध्ये ऑनलाईन बँकिंगच्या गुन्ह्यांचा आकडा 2093 होता, तर 2020 मध्ये हा आकडा 4000 हून अधिक झाला. डिजिटल पद्धतीमुळे लोकांना बरेच सोयीचे झालेले असले तरी ऑनलाईन बँकिंग गुन्ह्यांमुळे एक गट डिजीटल पद्धतीवर असंतोषही व्यक्त करत आहे. अनेकांनी भीतीमुळे अशा प्रकारची सोय नको म्हणून माघारही घेतली आहे.