संजीवनी योजनेंतर्गत राज्य सरकारचा पुढाकार : जि.पं.ला वस्तुंची सुची करण्याची सूचना
बेळगाव : महिला स्वसहाय्य संघाकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने स्वसहाय्य संघांच्या आर्थिक सबलीकरणास अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी राज्य सरकारने संजीवनी योजनेंतर्गत ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वसहाय्य संघातून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी तयार करण्यासाठी जिल्हा पंचायतीला सूचना केली आहे. स्वसहाय्य संघांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या स्वसहाय्य संघांकडून खाद्यपदार्थांसह विविध गरजेंच्या गृहोपयोगी वस्तू बनविल्या जातात. मात्र या वस्तुंच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ नसल्याने संघांची पिछेहाट होत आहे. तर महिला सबलीकरणाचा उद्देशही बाजुला पडत आहे. यासाठीच राज्य ग्रामीण जिवनोपयोगी संस्थेच्या माध्यमातून संजीवनी योजना राबविली जात आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 23 हजारांपेक्षा अधिक महिला स्वसहाय्य संघ आहेत. या स्वसहाय्य संघांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकवर्षी स्वसहाय्य विक्री केंद्रांचा मेळावा भरविला जातो. मात्र या मेळाव्या दरम्यानच या वस्तुंची बाजारपेठेत विक्री होते. नागरिकांनाही याची माहिती मिळते. यानंतर या स्वसहाय्य संघांकडून बनविलेल्या वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकवर्ग उपलब्ध नसतो. त्यामुळे या संघांची अपेक्षेनुसार आर्थिक सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. स्वसहाय्य संघांकडून अनेक दर्जेदार वस्तू तयार केल्या जातात. मात्र त्यांना विक्रीचे माध्यम माहित नसल्याने वस्तू दर्जेदार असूनही ग्राहक मिळत नाहीत. यासाठीच
ऑनलाईनवर स्वसहाय्य संघांच्या वस्तूंची विक्री व्हावी. त्यांना योग्य बाजारपेठेत योग्य प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून महिला स्वसहाय्य संघांकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी तयार करण्याची सूचना जि. पं.ला देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसह वस्तूंचे नमुने संग्रहीत केले जात आहेत. राज्य सरकारने या वस्तुंच्या विक्रीसाठी अमेझॉन सारख्या नामांकित ऑनलाईन विक्री बाजारांची निवड केली आहे. यामुळे जिल्ह्यात तयार होणाऱ्या वस्तू आता ऑनलाईनवर उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील स्वसहाय्य संघांकडून नाचण्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ, लोणचे, आयुर्वेदिक उत्पादने, पापड, शेवय्या, भाकर, चटणी, शुद्ध ऑईल, बनाना चिप्स या खाद्यपदार्थांसह मातीच्या वस्तू, लाकडी वस्तू, गृहोपयोगी सजावटीच्या वस्तू दागिने, चामडी वस्तू नामांकित करण्यात येणार आहेत. यानंतर या वस्तुंच्या विक्री संदर्भातील स्वसहाय्य संघांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या स्वसहाय्य संघांकडून खाद्यपदार्थांसह गृहोपयोगी वस्तू बनविल्या जातात. मात्र त्यांना वस्तूच्या विक्री संदर्भातील योग्य ज्ञान नसल्याने विक्री होत नाही. या व्यावसायिकांना प्राधान्य देण्यासाठी सरकारकडून ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंची सुची करण्याची सूचना करण्यात आली आहे.
-हर्षल भोयर, जि.पं.कार्यकारी अधिकारी