पाऊस न आल्यास डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्याची येणार वेळ
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने तळ गाठला असून आता डेडस्टॉकनंतरचे तीन फूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी 31 मे रोजी (31-05-2022) च्या पाणी पातळीपेक्षा सहा फूट पाणी पातळी कमी आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन फूट पाणीसाठा प्रवाहाने येण्यासाठी वेग कमी असल्याने डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाला विद्युत मोटारी बसविण्याची वेळ येणार आहे. डेडस्टॉकमधील पाणीसाठा किमान 15 दिवस पुरणारा आहे. त्यामुळे त्यापुढील पाणी मात्र पावसावरच अवलंबून राहणार आहे. 31 मे रोजी सकाळी जलाशय पाणी पातळी ही 2451.10 फूट इतकी होती. मागील वर्षी 31 मे रोजी 2456.90 फूट इतका पाणीसाठा होता. यावर्षी आतापर्यंत वळीव पावसाने 125 मी. मी. नोंद केली आहे. सन 2019 साली 29 जूनपर्यंत पावसाने दडी मारल्याने पाणी पातळी प्रथमच निच्चांकी पातळीवर नोंद झाली होती. डेडस्टॉकमधील चार फूट पाणी मोटारीद्वारे उपसा करत शहराला पाणीपुरवठा केला होता. या चार दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास यावेळीही डेडस्टॉकमधील पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत मोटारी पाण्यात सोडण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर येणार आहे.