केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजीजू यांचे प्रतिपादन : मुरगावातील अंटार्टिका संशोधन केंद्राला दिली भेट
प्रतिनिधी / वास्को
गोव्यातील नॅशनल सेंटर फॉर पोलार अँण्ड ओशन रिसर्च सागरी संशोधन क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असून भविष्यात या संशोधन कार्याच्या आधारे भारतीय आर्थिक विकास अधिक सुलभ होईल. अंटार्क्टिका खंडावरील संशोधन क्षेत्रात खासगी सहभागही महत्वाचा असून सागरी विज्ञान संशोधनाच्या कार्यात सर्वांना संधी खुल्या आहेत असे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजीजू यांनी केले. अंटार्विमटका खंडावर होणारे संशोधन कार्य व तेथील सोयीसुविधांवर आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले. भविष्यात अधिक विकासासाठी पावले उचलण्यात येतील, असे ते म्हणाले. केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजीजू यांनी या खात्याचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच वास्कोतील हेडलॅण्ड सडा बोगदा येथील नॅशनल सेंटर फॉर पोलार अँण्ड ओशन रिसर्च या संस्थेला काल शुक्रवारी दुपारी भेट दिली. या केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्रातील वैज्ञानिक अधिकारी व इतरांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अंटार्विमटका खंडावर संशोधन कार्यासाठी गेलेल्या वैज्ञानिकांच्या पथकाशी संपर्क करून त्यांच्याशीही चर्चा केली. मंत्री रिजीजू दुपारी साडेबारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावर उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले.
गोव्याला लाभलेय सुंदर वैज्ञानिक केंद्र
पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोव्यातील या वैज्ञानिक केंद्राला भेट देऊन आपण प्रभावीत झाल्याचे सांगितले. गोव्याला एक सुंदर वैज्ञानिक केंद्र लाभलेले असून या केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले संशोधन कार्य भविष्यात भारतीय आर्थिक विकासासाठी महत्वाचे ठरेल. नॅशनल सेंटर फॉर पोलार अँडण्ड ओशन रिसर्च ही संस्था राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन कार्यात तसेच आर्थिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. सरकारचे त्यांना पूर्ण सहकार्य लाभत आहे. भारताच्या विकासासाठी देशात निळी अर्थव्यवस्था बळकट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असून या दिशेने सरकार प्रयत्नरत आहे. पोलार आणि सागरी संशोधन क्षेत्रात अनेक विश्वविद्यालयांचाही सहभाग असून एनसीपीओबरोबर संयुक्तपणे त्या कार्यरत आहेत. सर्व खासगी संस्थानी या संशोधन कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांना दारे खुली आहेत. खासगी संस्थांच्या सहभागाने आम्हाला आनंदच होईल असे स्पष्ट केले.