केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत
प्रतिनिधी /मडगाव
सद्याच्या देशाच्या विविध भागात अग्निपथला विरोध होत आहे. रेलगाडय़ांना आग लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सैन्यदलांत भरती होऊ इच्छिणाऱयांकडून हिंसाचार माजविला जात आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, अग्निपथला होत असलेला विरोध हा गैरसमजातून होत आहे.
अग्निपथात काही चुका असल्यास त्या सरकारला दाखवून दिल्या पाहिजे. त्या चुका सुधारण्यास सरकार सदैव तत्पर आहे. सरकार जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. त्यामुळै चुका दाखवून दिल्यास त्या सुधारण्यास सरकार कुठेच मागे राहणार नाही. मुळात अग्निपथ विषयी असलेला गैरसमज दूर झाला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
गेल्या चार वर्षापूर्वी सैन्यदलात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण, कोविड महामारीमुळे ती स्थगित करण्यात आली होती. त्यावेळी ज्या उमेदवारांची निवड झाली होती. त्यांना ऑर्डर देणे बाकी होते. आत्ता अग्निपथमुळे आपल्याला संधी मिळणार नसल्याचा समज त्या उमेदवारांचा आहे. मात्र, सरकार यावर नक्कीच तोडगा काढणार असून त्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू
गोव्यात रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आंदोलन छेडले होते. या पैकी काही जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत व त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची नक्कीच भेट घेणार असल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. परंतु, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण का केले जाते याचा देखील विचार व्हायला पाहिजे. जलद गतीने एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जायचे असल्यास रेल्वेचे दुपदरीकरण आवश्यक आहे. आज देशात राष्ट्रीय महामार्गाचे सहापदीकरण तसेच चौपदरीकरण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत आपल्याला आवश्यक ठिकाणी पोचणे शक्य होते. पेट्रोल तसेच डिजेलची देखील बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.