पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण कोकण तसेच गोव्याच्या किनारपट्टीलगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, येत्या 24 तासांत त्याची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. दरम्यान, याच्या प्रभावामुळे कोकण तसेच गोव्याच्या काही भागांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तसेच किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण गोवा किनारपट्टीलगत पूर्वमध्य अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, पुढील दोन दिवस या चा प्रभाव कायम राहणार आहे. हे क्षेत्र पुढे समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या क्षेत्राच्या प्रभावामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या भागात सोसाटय़ाचा वारा वाहत असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यात किनारपट्टीलगच्या भागात या क्षेत्राचा प्रभाव अधिक आहे. शनिवारीही कोकण गोव्याच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, समुद्र खवळलेला राहणार आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. रविवारी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तरपूर्व व उत्तरपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढणार आहे. येत्या 48 तासांत हे क्षेत्र ओरिसा तसेच पश्चिम बंगालकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदमान निकोबार बेटे, मालदीव, ओरिसाच्या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या भागात समुद्राची स्थिती खवळलेली राहणार आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परतीसाठी पोषक स्थिती
मान्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असून, वायव्य तसेच उत्तरेच्या काही भागातून तो येत्या दोन ते तीन दिवसांत माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय कोकण गोवा किनारपट्टीवर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यानंतर 5 ऑक्टोबरच्या आसपास राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची प्रक्रिया सुरु होईल, तसेच विदर्भ व उत्तरमध्य महाराष्ट्रातून तो सर्वात प्रथम माघारी फिरेल, असे पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले.