महापालिकेच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच कचऱ्याची विल्हेवारी
बेळगाव : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये त्रैमासिक स्वच्छता अभियान राबविण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून आदेश आला आहे. त्यानुसार बेळगाव महापालिकेच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार असून कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कचऱ्याची विल्हेवारी वैज्ञानिक पद्धतीने करणार असल्याचे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. याबाबत मनपा कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. कचरा जमा झालेल्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. 2.0 योजनेंतर्गत स्वच्छ भारत योजना राबविण्यात येत आहे. त्याला सर्वांनीच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शहर किंवा नगर स्वच्छतेसाठी जनतेनेही तितकेच सहकार्य करणे गरजेचे असून कचरा देताना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
त्रैमासिक स्वच्छता अभियानसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा कशा पद्धतीने गोळा करायचा, कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संबंधित विभागात चालकांनी कशाप्रकारे पोहोचवायचा, याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आता तीन महिन्यांमध्ये शहरातील कचरा गोळा करण्याचे काम केले जाणार आहे.
शहरातील कचरा गोळा करण्याबरोबरच जनजागृती केली जाणार आहे. शाळा-महाविद्यालये व विविध वसाहतींमध्ये अधिकारी जाऊन स्वच्छता करणार आहेत. स्वच्छता कर्मचारी, चालक यासह इतर अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य निरीक्षकांना योग्य ती सूचना करून त्यांच्याकडून कचऱ्याचे वर्गीकरण करूनच कचऱ्याची विल्हेवाट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा विल्हेवारीची जनजागृती करण्यासाठी शाळा, विविध संस्था या ठिकाणच्या भिंती रंगवून त्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर देऊन शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या शहरामध्ये दोन वेळेत कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कचरा कमी होत आहे. असे असले तरी कचऱ्याचे वर्गीकरण करताना अजूनही सर्वसामान्य जनता सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा त्यांच्यासाठीही जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व नियोजन करून आरोग्य विभागाच्यावतीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.