बेळगाव : उन्हाळी सुटीनंतर सोमवार दि. 29 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. काही शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. बुधवार दि. 31 रोजी प्रारंभोत्सव आयोजित करण्यात आला असून त्या दिवसापासून विद्यार्थी शाळांमध्ये दाखल होणार आहेत. सोमवारी सकाळपासून शिक्षक शाळांवर दाखल झाले. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह यांची स्वच्छता करण्यात आली. याचबरोबर वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे, शालेय आराखडा, शैक्षणिक नोंदी, कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात सोमवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले होते. मागील वर्षीची उजळणी घेऊन नवीन वर्षाच्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पहिले दोन दिवस उजळणी
बुधवार दि. 31 पासून विद्यार्थी शाळांमध्ये दाखल होणार आहेत. पहिले दोन दिवस उजळणी झाल्यानंतर बुधवारी प्रारंभोत्सव होणार आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाल्यानंतर त्यांना मिठाईचे वाटप करून फूल देऊन स्वागत केले जाणार आहे. त्याचबरोबर पाठ्यापुस्तकांचे वितरण त्याच दिवशी होणार आहे. आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 95 टक्के शाळांमध्ये पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. 31 मे ते 3 जून दरम्यान विद्यार्थी नोंदणी मोहीम आयोजित केली जाणार आहे.
दैनंदिन कामकाजाला सुरुवात
सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शाळेची स्वच्छता त्याचबरोबर दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली. बुधवार दि. 31 रोजी प्रारंभोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
– बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी
शाळांची दुरुस्ती करण्याचे आदेश
येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. सोसाट्याचा वारा आणि धुवांधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारती कोसळणे, धोकादायक वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश शिक्षण विभागाने शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्याचबरोबर किरकोळ स्वरुपात दुरुस्ती असेल तर ती जून महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.