टोमॅटो, भेंडी, गाजर, मिरची आणतेय डोळ्यांत पाणी : सामान्य नागरिकांना फटका
पणजी : राज्यात गेल्या महिनाभरापासून कांद्याने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याच्या वाढलेल्या दरात अगोदरच नागरिक त्रस्त असून आता टोमॅटो आणि मिर्चीच्या दरातही वाढ झाल्याने सामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. गेल्या आठवड्याभरात टोमॅटो 20 ते 25 रुपये प्रतिकिलो दराच्या भावाने विकले जात होते, त्यात जवळपास 30 रुपयांची वाढ होऊन सद्या पणजी बाजारपेठेत टोमॅटो 40 ते 50 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. गोवा फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर टोमॅटो सद्या 36 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. मिरची सद्या पणजी बाजारपेठेत 80 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात असून, फलोत्पादन महामंडळात 56 रुपये आहे. महाराष्ट्र व कर्नाटकमधून गोव्यात भाज्यांची आवक केली जाते. देशभरात अवेळी पडलेल्या पावसामुळे गेल्या महिनाभरात कांद्याच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे कांद्याची आवक गोव्यात कमी झाल्याने दर गगनाला भिडले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर 60 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर कांदे 57 रुपये आहेत.
बाजारात नवीन कांदा दाखल झाला असला तरी आणि केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवले असले तरी कांद्याचे दर चढेच आहेत. गोमंतकीयांच्या जेवणात कांद्यासोबत टोमॅटोचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जालो. चतुर्थीच्या काळात देखील टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे नागरिक त्रस्त होते. तेव्हा टोमॅटोचे दर 150 रुपये पर्यंत पोहेचले होते. दसरा व दिवाळीच्या काळात सर्वत्र कांद्याने लोकांना त्रस्त केले तर पुन्हा टोमॅटो आणि मिरचीच्या महागाईने आपले डोके वर काढले आहे. पणजी बाजारपेठात इतर भाज्यांच्या दरात देखील वाढ झाल्याने सामान्य लोकांना त्याचा फटका बसत आहे. गेल्या आठवड्याभरात भेंडी 40 रुपये किलो दराने विकली जात होती, ती सद्या 60 रुपये दराने विकली जात आहे. बटाटे 40 रु., गाजर 60 रुपये, वालपापडी, कॉलीफ्लावर 30 रुपये, वांगी 40 रुपये, चिटकी 60 रुपये, घोसाळी 80 रुपये, ढबू मिरची 80 रुपये, कोथंबीर 20 रुपये जुडी, आले 160 रुपये, लसूण 240 रुपये, गावठी तवशी 40 रुपये तर लिंबू 20 रुपयांना 8 अशा दराने विकले जात आहेत. मुळा 30 रुपये, लाल भाजी 20 ते 25 रुपये, वाल 50 रुपये अशा दराने गावठी भाज्या विकल्या जात आहे.
टोमॅटोची आवक घटल्याने दरवाढ : देसाई
कांद्यानंतर टोमॅटोची आवक बेळगावमधून कमी झाल्याने टोमॅटोचे दर गोव्यात वाढले आहेत. हे दर पुढील आठवड्याभरात कमी होण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात टोमॅटो 50 ते 60 पर्यंत पोहोचला असला तरी फलोत्पादन महामंडळाच्या दुकानांवर 36 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत, अशी माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.