ऐन गणेशचतुर्थीत खांडेपारवासियांचा इशारा : बंधारा प्रकल्पाच्या विरोधात पणजीत निदर्शने
पणजी : खांडेपार येथे बंधारा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पाला खांडेपारवासियांचा विरोध असतानाही तो पुढे रेटला जात आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून सरकारने हुकूमशाहीपद्धतीने लागू केलेला जमावबंदीचा (कलम 144) आदेश मागे घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी चतुर्थी काळात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा खांडेपारवासियांनी दिला आहे. पणजीतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात खांडेपारवासियांनी खांडेपार बंधारा प्रकल्पाला तीव्र विरोध केला. यावेळी गावडा – कुणबी-वेळीप (गाकुवेध) संघटनेचे नेते रामा काणकोणकर, कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या माजी सरपंच श्रावणी गावडे, पंच सदस्य अभिजित गावडे, एसटी समाजाचे नेते अनिल गावडे, धीरज गावडे, संदेश गावडे, नरेश गावडे, शशिकला गावडे, चंद्रावती गावडे, लक्ष्मी गावडे, शशिकला नाईक, गुऊदास नाईक आदी दीडशेहून अधिक खांडेपारवासीय आझाद मैदानावर उपस्थित होते.
श्रावणी गावडे म्हणाल्या, खांडेपार नदीवर पावसाळ्यात मोठा पूर येतो. 2021 मध्ये या भागात पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने कोणत्याच प्रकारची मदत केली नव्हती. आता जर या नदीवर बंधारा बांधला तर येथील ग्रामस्थांची घरे बुडण्याचा धोका आहे. या बंधाऱ्याला अनेकवेळा विरोध करूनही या बंधाऱ्याचे काम सरकार रेटत आहे. गावात ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी व मंत्री यांना निवेदन देऊनही सरकार स्थानिकांचा आवाज न ऐकता हा प्रकल्प आणत आहे. यामध्ये सरकारची भूमिका संशयास्पद दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. रामा काणकोणकर यांनी सांगितले की, जर लोकांचाच विरोध असेल तर हा प्रकल्प सरकारला का हवा आहे. जर लोकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असतानाही सुमारे 88 कोटी ऊपये या प्रकल्पासाठी का म्हणून खर्च करू पाहत आहे. आझाद मैदानावर येऊन आम्ही सरकारच्या कानी खांडेपारवासियांचा आवाज पोहोचवत आहोत. तरीही सरकारला जाग न आल्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी गणेशमूर्तीसह चतुर्थीकाळात ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा त्यांनी दिला.
लोकांचा विरोध डावलून 88 कोटी खर्च का? : विजय सरदेसाई
खांडेपारवासियांना जर बंधारा प्रकल्प नकोच असेल तर सरकार का म्हणून 88 कोटी ऊपये या प्रकल्पासाठी खर्च करत आहे, असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. मोठ-मोठे प्रकल्प आणून गावातील लोकांच्या शेतजमिनी नष्ट करण्याचा हा सरकारचा डाव आहे. खांडेपार गावात हा बंधारा उभारल्यास त्याचा ग्रामस्थांना नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प तडीस नेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. खांडेपारवासियांनी हार न मानता संघटितपणे लढा द्यावा, आपण त्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासनही सरदेसाई यांनी दिले.
गाकुवेध, गोवा फॉरवर्ड, आरजीचा पाठिंबा
खांडेपारवासियांनी बंधाऱ्याच्या प्रकल्पाला जो विरोध केला आहे, त्याला गाकुवेध संघटना, गोवा फॉरवर्ड पक्ष व आरजीच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आमदार विजय सरदेसाई, आरजीचे मडकईचे नेते प्रेमानंद गावडे व गाकुवेध संघटनेच्या नेत्यांनी खांडेपारवासियांच्या पाठिशी असल्याचे सांगत खांडेपार येथील बंधारा उभारू नये, अशी सरकारकडेही मागणी केली आहे.
खांडेपार येथे कलम 144 अंशत: शिथिल
खांडेपार येथे बंधारा प्रकल्प उभारताना लोकांनी एकत्र जमून विरोध करू नये, यासाठी जमावबंदी (144 कलम) आदेश काढण्यात आला होता. परंतु दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या विरोधानंतर 144 कलम अंशत: शिथिल केले आहे. मुर्डी-खांडेपार येथे लागू केलेले 144 कलम शिथिल करताना हे कलम सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. लग्नसोहळा, अंत्ययात्रा आदींसाठी हे कलम वगळण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.