पंतप्रधानांची ‘गॅरंटी’ : ‘भारत मंडपम’चे उद्घाटन : भारतीय अर्थव्यवस्था ‘टॉप-3’मध्ये नेण्याचा निर्धार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील प्रगती मैदानावर ‘भारत मंडपम’ कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची हमी देतानाच पंतप्रधानांनी देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत ‘टॉप-3’मध्ये नेण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर नवीन आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर संकुल अर्थात ‘आयईसीसी’ राष्ट्राला समर्पित केले. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला ‘भारत मंडपम’ असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा थाटात आणि झगमगाटात संपन्न झाला. याप्रसंगी स्मारक तिकीट आणि नाण्यांचे अनावरणही करण्यात आले. ‘भारत मंडपम्’ पाहून आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. ‘भारत मंडपम’ हे भारताचे सामर्थ्य आणि नवनिर्मितीचे प्रतिक असून त्यातून भव्यता आणि इच्छाशक्तीचे दर्शन घडते, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मोठा दावा करताना माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असा निर्धार व्यक्त केला. आज देशवासियांचा विश्वास दृढ झाला असून आता देशाचा विकास प्रवास थांबणार नाही. आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुऊवातीला, भारत जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये 10 व्या क्रमांकावर होता. दुसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आता त्यापुढेही जाऊन तिसऱ्या टर्ममध्ये भारत ‘टॉप-3’ अर्थव्यवस्थांमध्ये धडक घेईल, असे पंतप्रधानांनी छातीठोकपणे सांगितले.
कारगिल युद्धातील हुतात्म्यांचे स्मरण
यावेळी पंतप्रधानांनी कारगिल युद्धातील शहिदांचे स्मरणही केले. आजचा दिवस प्रत्येक देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. देशाच्या शत्रूंनी दाखवलेल्या धाडसाचा भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या शौर्याने पराभव केला. संपूर्ण देशाच्यावतीने मी कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला श्र्रद्धांजली अर्पण करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारत ‘लोकशाहीची माता’ आहे. देशात सध्या स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा होत असताना ‘भारत मंडपम’ ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे. काही आठवड्यांनंतर येथे जी-20 शी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. जगातील प्रमुख देशांचे प्रमुख येथे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची ताकद आणि वाढती उंची या ‘भारत मंडपम्’मधून दिसेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
विरोधकांवरही टीकास्त्र
यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. ‘भारत मंडपम्’ या भव्य वास्तूचे बांधकाम थांबवण्यासाठी नकारात्मक विचारसरणीच्या लोकांनी न्यायालयाच्या चकरा मारल्या, असे ते म्हणाले. प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणण्याचा आणि अडवण्याचा काहींचा स्वभाव असतो, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. यावेळी ‘भारत मंडपम’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधानांनी ऐकवली कविता…
‘भारत मंडपम’च्या भव्य वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी या संकुलाचा महिमा व्यक्त करणाऱ्या काही काव्यपंक्तीही ऐकवल्या.
नया प्रात: है, नई बात है, नई किरण है, ज्योति नई,
नई उमंगे, नई तरंगे, नई आस है, सांस नई।
उठो धरा के अमर सपूतों पुन: नया निर्माण करो,
जन जन के जीवन में फिर से नई स्फूर्ति नव प्राण भरो।