देशाच्या उत्तर भागात सध्या मान्सूनच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, इमारतीची पडझड, रेल्वेमार्ग विस्कळीतपणा, दरडी कोसळून महामार्ग ठप्प, भूस्खलनासारख्या दुर्घटनांचे प्रमाण आवाक्याबाहेर वाढलेले आहे. हिमाचल प्रदेशात तर पावसाने गेल्या दहा वर्षांतला विक्रम मोडलेला असून, अजूनही कोसळणाऱ्या पावसाने थांबण्याचे नाव घेतलेले नाही. नैऋत्य मान्सूनने यंदा पर्जन्यवृष्टीला उशीर केल्याकारणाने गोव्यासारख्या छोट्या राज्यासमोर पाण्याचे दुर्भिक्ष्य उभे राहिले. गेल्या दहा-बारा दिवसांत गोव्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यासाठी आवश्यक गटार व्यवस्था नसल्याने आणि बऱ्याच ठिकाणी नदी-नाले कचरा, सांडपाणी यांच्या संकटांनी ग्रस्त झाल्याने शहरी भागातले रस्ते पाण्याखाली गेले. धुंवाधार पावसाच्या माऱ्यामुळे शेती, बागायती पिकांवरती दुष्परिणाम जाणवणार आहे. गोव्यातल्या पश्चिम घाटाला समाधानकारक असे वृक्षाच्छादन असल्याकारणाने कोसळणारा पाऊस, नदीनाल्यांतून जसा पूर्वी वाहायचा, त्या परिस्थितीत बराच कायापालट झाल्याने पाणी वाहून नेण्याची नदी-नाल्यांची क्षमता दुर्बल होत चालली आहे.
दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथे कोसळणाऱ्या पावसाने तेथील लोकजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत केलेले आहे. हरियाणातल्या यमुना, घाग्गर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असल्याने तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचे पाणी नदीनाल्यांच्या पात्रातून काही ठिकाणी वाहत असल्याने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांच्या घरांना, शेतीला त्याचा फटका बसलेला आहे. पंजाबमध्ये मोहाली, आनंदसाहिब, पठाणकोट, रुपनगर, नवानशहर आणि फतेहगड साहिब येथे सातत्याने होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे तेथील रस्ते, रेल्वेमार्ग, शेती पाण्याखाली गेलेली आहे. यमुना आणि घाग्गर या नदींची पातळी सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे वाढत चालली असल्याने, हरियाणा सरकारने काही जिल्ह्यात सैन्यदलाच्या मदतीने तेथील संकटग्रस्त लोकांना अन्य सुरक्षित स्थळी हलविलेले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारी यंत्रणेला घ्यावा लागलेला आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली महानगरात तर कोसळणाऱ्या पावसाने तेथील बरेच रस्ते पाण्याखाली घेतले आहे. या पाण्याचा निचरा करण्यात सुरळीतपणे वाहून नेणाऱ्या गटारांची दुरावस्था झाल्याने रस्ते पाण्याखाली जाण्याचा प्रकार घडतो आहे.
जून 24 पासून हिमाचल प्रदेशात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मनुष्यहानी, गुराढोरांबरोबर अन्य पाळीव प्राण्यांना मृत्यूच्या कवेत घेतलेले आहे. हिमाचल प्रदेशातल्या काही जिल्ह्यात एका महिन्याला पडणारा पाऊस चक्क एकाच दिवसात कोसळल्याने तेथील जनतेची त्रेधातिरपिट उडालेली आहे. सरासरीपेक्षा यंदा हिमाचल प्रदेशात विलक्षण पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्यामुळे बियास नदीने सुद्धा प्रलयंकारी रुप धारण केलेले आहे आणि त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे मंडीतील बाजार आणि बगलमार्गाला जोडणारा चाळीस वर्षे जुना पूल वाहून गेलेला आहे. कस्पटाप्रमाणे चारचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून जाताना तेथील लोकांना हताशपणे पाहण्याची वेळ आलेली आहे. चंब्याचा बकाणी परिसर रावी नदीचा प्रवाह धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने, पलीकडच्या लोकांची परिस्थिती बरीच बिकट झालेली आहे. हिमाचल प्रदेशातल्या काही ठिकाणी तर चक्क ढगफुटी होऊन त्यात उद्भवलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गाचे मोठे नुकसान झालेले आहे.
प्रचंड आणि वारेमाप पर्जन्य वृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी लोकांची राहती घरे वाहून गेलेली आहे. वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मोठमोठ्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोक अगदी जीव मुठीत धरून कसेबसे खडतरपणे जीवन जगत आहेत. 15 ते 17 जून 2013 मध्ये केदारनाथमध्ये जसा पाऊस कोसळत होता तसाच रौद्र भीषणरित्या पाऊस हिमाचलात कोसळत आहे. वीज पडून, पाण्यात बुडून आणि अतिवृष्टीमुळे उत्तर प्रदेशात अनेकजण मृत्यूमुखी पडलेले आहेत. हिमाचलातील बा•ाr, कुलू आणि उना येथील पूल वाहून गेलेले आहेत तर कुलूतील लार्जी ऊर्जा प्रकल्प पाण्याखाली गेलेला होता. हिमाचल प्रदेशातल्या दऱ्याखोऱ्यांत पदभ्रमण, गिर्यारोहण आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची अडकून पडल्याने कोंडी झालेली आहे. 24 जूनपासून कोसळणाऱ्या धुँवाधार पावसाच्या तडाख्यात हिमाचल प्रदेशमध्ये 75 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू आलेला आहे. किन्नोर, मंडी, लाहौल, स्पीतीमध्ये प्रलयंकारी पर्जन्यवृष्टीचा फटका तेथील जनतेला बसलेला आहे. सैन्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाबरोबर अन्य सरकारी यंत्रणांमार्फत भूस्खलन, पूर आणि अन्य आपत्तीत फसलेल्यांना मदतीचा हात दिला जात असला तरी हिमाचल प्रदेशावरती जी यंदा पर्जन्यवृष्टी झाली तशी गेल्या पन्नास वर्षांत झालेली नव्हती, असे म्हटले जात आहे.
देशाच्या आठ राज्यात प्रलयंकारी पर्जन्यवृष्टीमुळे अस्मानी संकट निर्माण झालेले आहे. महामार्ग, रेल्वेमार्ग, विमानसेवा विस्कळीत होण्याबरोबर कृषी उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एकीकडे विनाशकारी पर्जन्यवृष्टीमुळे संकटग्रस्त लोकांना उत्तर भारतातल्या बऱ्याच ठिकाणी सुरक्षितरित्या स्थलांतरीत केले जात आहे तर दुसरीकडे दुष्काळी प्रदेशातले शेतकरी पावसाच्या आगमनाकडे आपले डोळे लावून बसलेले आहे. मराठवाड्यात बऱ्याच धरणांमधला पाण्याचा साठा संपलेला असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मेघ-बीजारोपणाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या देशात प्रदीर्घ काळ थेंबभर पाऊस नसणे आणि त्यानंतर तो धुँवाधार कोसळणे, हे खरेतर भारतीय पर्जन्यवृष्टीचे वैशिष्ट्या झालेले आहे. एका बाजूला उत्तर भारतातल्या बऱ्याच राज्यातली जनता मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीच्या प्रकोपाला सामोरी जात आहे तर दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त भागातील जनता पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे. हा विरोधाभास हवामान बदल आणि तापमान वाढीच्या संकटामुळे आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे या संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता ठेवण्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्याबरोबर या संकटांत सापडलेल्यांना त्वरित मदतीचा हात देण्याची नितांत गरज असते.
आज आपली सरकारी यंत्रणा गतिमान विकासाचा वारू चौफेर उधळत पुढे नेत असताना एखाद्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती, तेथील भूमीची सिमेंट-काँक्रिटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या बांधकामांना धारण करण्याची क्षमता, याचा विचार करत नाही. रस्ते, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग आणि अन्य साधनसुविधा पुरविण्याबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाचा विचार न करता विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यातून धडा घेऊन नदीनाले, डोंगरदऱ्या यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न खूपच अल्प प्रमाणात होत आहेत. त्यामुळे कल्पनेपलीकडे कोसळणाऱ्या पावसाच्या प्रलयंकारी रुपासमोर येथील मानवी समाजाला नतमस्तक होण्याची वेळ आलेली आहे. आज हिमाचल प्रदेश उद्या आणखी एखादे राज्य, अशा प्रलयंकारी पर्जन्यवृष्टीच्या तडाख्यात हतबल होणार आहे. संकटांची चाहूल घेऊन त्यांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने आम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रयत्न केले नाही तर अविवेकी आणि अति गतिमान विकासाची कडूफळे आमच्या वाट्याला येतील.
– राजेंद्र पां. केरकर