राष्ट्रपती निवासस्थानावर आंदोलकांचा कब्जा ःपंतप्रधान विक्रमसिंघेंचा राजीनामा
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा रोष अजूनही कमी झालेला नाही. देशभरात तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना शेकडो लोक पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांच्या जमावाने त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. या निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढला. राजपक्षे देश सोडून जातील अशी अटकळ प्रसारमाध्यमांमधून वर्तवली जात आहे. तथापि, प्रशासनाकडून यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याचदरम्यान, वाढत्या जनक्षोभानंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी रात्री उशिराने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आंदोलनादरम्यान काही लोक राष्ट्रपती निवासस्थानाच्या आवारात घुसले. यानंतर सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींना घराबाहेर काढले आणि सुरक्षितस्थळी नेले. श्रीलंकेतील सिरसा टीव्ही या टीव्ही चॅनलने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये राष्ट्रपतींच्या निवासस्थानात जमाव प्रवेश करताना दिसत आहे. मात्र, सुरक्षा दलांनी पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. निदर्शनादरम्यान 30 हून अधिक लोक जखमी झाले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांचा एक गट श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या स्टेडियमबाहेर पोहोचल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रपती भवनात घुसलेले आंदोलक आतून फेसबुक लाईव्ह करत आहेत. इमारतीच्या कॉरिडॉर आणि खोल्या गर्दीने व्यापल्या आहेत. काही आंदोलक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाही दिसले.
श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अन्नापासून ते इंधनापर्यंत अनेक वस्तूंचा संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. घरांमध्येही वीज काही तासच येत आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा सतत कमी होत असल्याने ते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक वस्तूही आयात करू शकत नाहीत. या भयावह स्थितीमुळे जनक्षोभ वाढल्याचे शनिवारी पुन्हा एकदा दिसून आले.
तातडीच्या बैठकीनंतर पंतप्रधान पायउतार
दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि तातडीने तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या सहभागाने तातडीची बैठक बोलावली. श्रीलंकेच्या डेली मिररने पंतप्रधानांच्या मीडिया विभागाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मात्र, ते प्रचंड जनक्षोभाला शांत करतील की नाही याबाबत संदिग्धता आहे. विक्रमसिंघे यांनाही सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. त्यानंतर रात्री त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले असून आता श्रीलंकेतील राजकीय अस्थिरता वाढली आहे.
गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार?
श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात ज्याप्रकारे निदर्शने वाढत आहेत, ते पाहता त्यांना पदावर राहणे फार कठीण आहे. त्यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनीही निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यानंतर घरातून पळ काढला होता. या घटनेनंतर महिंदा यांनीही राजीनामा दिला होता. अशा स्थितीत गोटाबाया राजपक्षेही महिंदाच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच राजीनामा देऊ शकतात, असे दिसते. मात्र, असे केल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार असल्याने गोटाबाया प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलतील, असा तर्क वर्तवला जात आहे.
राष्ट्रपती राजपक्षेंना हटवण्याचा आग्रह
श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात ‘गोटा गो गामा’ आणि ‘गोटा गो होम’ आंदोलन सुरू आहे. गामा म्हणजे सिंहली भाषेत गाव. आतापर्यंत आंदोलक एकाच ठिकाणी तंबू ठोकून राष्ट्रपती आणि सरकारच्या विरोधात ‘गोटा-गो-गामा’च्या घोषणा देत होते. मात्र, आता जनक्षोभ भडकला असून सरकारी यंत्रणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडणे हा त्यांचा उद्देश आहे.
सनथ जयसूर्याही आंदोलनात
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या हासुद्धा या आंदोलनात सहभागी झाला होता. मी या निषेधाचा भाग आहे आणि लोकांच्या मागणीसोबत उभा आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे, असे जयसूर्याने कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या निदर्शनावेळी सांगितले.
स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट
श्रीलंकेत समाजातील जनक्षोभ अनपेक्षितपणे वाढला आहे. काही ठिकाणी दंगलीच्या घटनाही घडत आहेत. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये बंद आहेत. श्रीलंकेत लोकांना दैनंदिन वस्तूही मिळत नाहीत किंवा अनेक पटींनी महागल्या आहेत. परकीय चलनाचा साठा जवळपास संपला आहे, त्यामुळे ते जीवनावश्यक वस्तूही आयात करू शकत नाहीत. सर्वात मोठी समस्या म्हणजे इंधनाची कमतरता असून पेट्रोल आणि डिझेलसाठी अनेक किलोमीटर लांब रांगा आहेत. बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, लष्कर आणि वायुसेना जवान पेट्रोल पंपावर लक्ष ठेवून आहेत. तरीही आंदोलने होत आहेत.
वेगवान घडामोडी…
@ श्रीलंका पीपल्स प्रंटच्या खासदारांचे गोटाबाया राजपक्षे यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आवाहन.
@ राष्ट्रपती निवासस्थानाला घेराव घालणाऱया आंदोलनावेळी पोलिसांतकडून नियंत्रणासाठी हवेत गोळीबार.
@ श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडून सभापतींना संसदसत्र बोलावण्याची विनंती.
@ देशातील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका पोलिसांकडून अनेक प्रांतांमध्ये संचारबंदी लागू.
@ देशातील वाढत्या गोंधळाच्या वातावरणात श्रीलंकेच्या बार कौन्सिलने राष्ट्रपती गोटाबाया यांची भेट घेतली.