वृत्तसंस्था/ विजयवाडा
भारताची माजी आंतरराष्ट्रीय महिला धावपटू पी. टी. उषाने स्वत:ची अॅथलेटिक अकादमी लवकरच स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पी. टी. उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत.
आंध्रप्रदेश अॅथलेटिक संघटना तसेच या राज्यातील विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी विजयवाडा येथे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा व त्यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचा भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी पी. टी. उषा यांनी अॅथलेटिक अकादमी स्थापनेची घोषणा केली. अॅथलेटिक अकादमी स्थापन झाल्याने देशाला अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅथलिट्स उपलब्ध होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या पी. टी. उषा यांचे सुमारे 25 अॅथलिट्सना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळत आहे.