पुणे / प्रतिनिधी :
आमदार गोपीचंद पडळकर यांची अजितदादांवरील टीका ही अशोभनीय, राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारी नाही, असे सांगत, याबाबत पडळकर यांच्याकडे आपण आपली नाराजी व्यक्त केली असून, चर्चा केली आहे तसेच त्यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
बावनकुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय, राज्याच्या संस्कृतीला सोडून आहे. प्रत्येकाला समाज महत्वाचा असून, त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून, मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा, ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून, उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही.
पंतप्रधानांचे काम कायद्यानुसारच
संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीचे लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.
प्लॅन बी कशाला?
विरोधकांना काहीच सूचत नसल्याने हा ‘प्लॅन बी’,नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपाकडे कोणताच प्लॅन बी नसून, त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य 45 हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. मोदीजींच्या कामांमुळे सर्व त्यांच्याकडे पाहूनच मते देणार आहे.
रोहित पवारांना वाटतेच मीच वारसदार
अजित पवार आमच्याकडे आल्यावर रोहित पवार यांना संधी दिसू लागली असून, शरद पवारांचा वारसदार मीच आहे, असे वाटू लागले असावे. अर्थहिन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही.