शदाब खान ‘सामनावीर’, मोहम्मद नबी ‘मालिकावीर’
वृत्तसंस्थ/ शारजाह
अफगाण संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकचा व्हाईटवॉश करण्याची संधी गमावली. या मालिकेतील सोमवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकने अफगाणचा 66 धावांनी पराभव केला. अफगाणने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. अफगाणच्या मोहम्मद नबीला ‘मालिकावीर’ तर पाकच्या शदाब खानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 7 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 18.4 षटकात 116 धावात आटोपला.
पाकच्या डावामध्ये अयुबने 40 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 49, तयाब ताहिरने 2 चौकारांसह 10, अब्दुल्ला शफिकने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 23, इफ्तिकार अहमदने 25 चेंडूत 2 षटकारासह 31, इमाद वासिमने 7 चेंडूत 2 चौकारांसह 13, कर्णधार शदाब खानने 17 चेंडूत 5 चौकारांसह 28, नवाजने नाबाद 5 तर मोहम्मद वासिमने 4 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. पाकच्या डावात 7 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे मुजिबऊर रेहमानने 2, फारुकी, नबी, फरिद अहमद, रशिद खान आणि करिम जनत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावात गुरबाजने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18, अटलने 1 षटकारासह 11, इब्राहिम झद्रानने 3, घनीने 17 चेंडूत 1 चौकारासह 15, नबीने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, कर्णधार रशिद खानने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 3 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. त्यांच्या डावात 5 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शदाफ खानने 13 धावात 3, इमाद वासिम, झमान खान, मोहम्मद वासिम यांनी प्रत्येकी 1 गडी तसेच एहसानऊल्लाने 29 धावात 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – पाक : 20 षटकात 7 बाद 182 (अयुब 49, ताहिर 10, अब्दुल्ला शफिक 23, इफ्तिकार अहमद 31, इमाद वासिम 13, शदाब खान 28, नवाज नाबाद 5, मोहम्मद वासिम नाबाद 9, अवांतर 13, मुजिबऊर रेहमान 2-28, फारुकी, नबी, फरिद अहमद, रशिद खान, करिम जनत प्रत्येकी 1 बळी), अफगाण : 18.4 षटकात सर्व बाद 116 (गुरबाज 18, अटल 11, इब्राहिम झद्रान 3, गनी 15, नबी 17, रशिद खान 16, ओमरझाई 21, अवांतर 9, एहसानऊल्ला 3-29, शदाब खान 3-13, इमाद वासिम, झमान खान, मोहम्मद वासिम प्रत्येकी 1 बळी).