वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान सरकार आणि तालिबानदरम्यानचा तणाव आता वाढत चालला आहे. अफगाण सीमेवर गोळीबारानंतर पाकिस्तानच्या सैन्याने तोर्खम सीमा बंद करण्याचा आदेश दिला होता. आता अफगाणिस्तानातून आलेल्या शरणार्थींच्या विरोधात मौठी कारवाई करण्यात येणार आहे. अफगाणिस्तानातून आलेल्या 11 लाख शरणार्थींना त्यांच्या मायदेशी पाठविण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या निर्णयाला पाकिस्तानच्या धोरणातील मोठा बदल मानले जात आहे.
अंतरिम सरकारने अफगणिस्तानातून आलेल्या 11 लाख शरणार्थींना परत पाठविण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. हे अफगाणी नागरिक पाकिस्तानात अवैध वास्तव्य करत असल्याचे पाक सरकारचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानी राजवट आल्यापासून 4 लाख अफगाणी नागरिकांनी पाकिस्तानात अवैध मार्गाने प्रवेश केल्याचे मानले जात आहे.
देशात अवैध स्वरुपात वास्तव्य करणाऱ्या 7 लाख अफगाण नागरिकांची ओळख पटविण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सरकारने या अफगाण नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश दिला आहे. या 11 लाख शरणार्थींकडे व्हिसा तसेच पाकिस्तानात वास्तव्य करण्यासाठी वैध दस्तऐवज नाही. पाकिस्तानने स्वत:च्या या निर्णयाची माहिती तालिबानी राजवटीला दिली आहे. टीटीपी दहशतवाद्यांवरून तालिबानसोबत तणाव निर्माण झाला असताना पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.
पाकिस्तानने अनेकदा धमकी दिल्यावरही तालिबानी राजवट टीटीपी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. तर पाकिस्तानच्या नव्या निर्णयानंतर तालिबान देखील प्रत्युत्तरादाखल पाऊल उचलू शकते. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानविरोधात टिप्पणी केली जाण्याची शक्यता आहे.