वृत्तसंस्था/ नैरोबी
पाकिस्तानी पत्रकार अरशद शरीफ यांची केनियात गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. अरशद यांच्या पत्नीने सोमवारी याची पुष्टी दिली आहे. पाकिस्तान विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी केनियातील पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱयांकडून याप्रकरणी माहिती मिळवत आहोत असे सांगितले आहे. अरशद शरीफ यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे कयास व्यक्त होत आहेत. शरीफ हे पाकिस्तानातील राजकीय उलथापालथीदरम्यान चर्चेत होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अरशद शरीफ समर्थन देत हेते. तसेच पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर त्यांनी अनेकदा टीका केली होती. पाकिस्तानी पत्रकारांनी शरीफ यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे.