बांगलादेशवर 5 गडय़ांनी विजय, शाहिन आफ्रिदी ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ ऍडलेड
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या गट 2 मधील सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडय़ांनी पराभव केला. दरम्यान याच गटातील झालेल्या दुसऱया एका सामन्यात नेदरलँडस्ने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिल्याने पाक संघाने या स्पर्धेत नाटय़मयरित्या उपांत्य फेरी गाठली. आता या स्पर्धेत न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. बुधवारी पाक आणि न्यूझीलंड यांच्यात तर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जातील. 22 धावात 4 बळी मिळवणाऱया पाकच्या शाहिन आफ्रिदीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
रविवारच्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली. पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पाकने 18.1 षटकात 5 गडय़ांच्या मोबदल्यात 128 धावा जमवित आपला विजय 11 चेंडू बाकी ठेऊन नोंदविला. दरम्यान गट 2 मध्ये रविवारच्या सामन्यापूर्वी दुसऱया स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्स संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने पाक संघाचे विजयानंतर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. या स्पर्धेमध्ये सुपर 12 फेरीत पाक संघाला दोन पराभव यापूर्वी स्वीकारावे लागले होते. भारत आणि झिंबाब्वे यांनी पाकला पराभूत केल्याने त्यांना उपांत्य फेरी गाठण्याची अंधुक आशा होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताचे उपांत्य फेरीतील स्थानही पक्के झाले आणि पाकला उपांत्य फेरी गाठण्याची संधीही मिळाली.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या नजमूल हुसेन शांतोने 48 चेंडूत 7 चौकारासह 54 धावा जमविल्या. तो चौथ्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. लिटॉन दासने 1 षटकारासह 10 तर सौम्या सरकारने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 तर अफिफ हुसेनने 20 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 24 धावा जमविल्या. कर्णधार शकीब अल हसनला खाते उघडता आले नाही. बांगलादेशने या सामन्यात 150 पेक्षा अधिक धावा जमवल्या असत्या तर कदाचित पाकला विजयासाठी झगडावे लागले असते. बांगलादेशच्या डावामध्ये चारच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. शाहिन आफ्रिदी हा सर्वात भेदक गोलंदाज ठरला. त्याने 22 धावात 4 तर शदाब खानने 30 धावात 2 तसेच हॅरीस रौफ आणि इफ्तिकार अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहमद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर सावध फलंदाजी करताना सलामीच्या गडय़ासाठी 10.3 षटकात 57 धावांची भागीदारी केली. नसूम अहमदने बाबर आझमला रेहमानकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 2 चौकारासह 25 धावा जमविल्या. इबादत हुसेनने रिझवानचा बळी मिळवला. नजमूल हुसेनने त्याचा अप्रतिम झेल घेतला. रिझवानने 32 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 32 धावा जमवल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात मोहम्मद नवाज दासच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने 4 धावा जमविल्या. 14.4 षटकात पाकने 3 बाद 92 धावा जमविल्या होत्या. त्यांना विजयासाठी 36 धावांची जरुरी होती. मोहमद हॅरीस आणि शान मसूद यांनी पाकला विजयाच्या समीप नेले. हॅरीसने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 31 धावा जमविल्या. तो 17 व्या षटकात बाद झाला. मुस्तफिजूर रेहमानने इफ्तिकार अहमदला एका धावेवर झेलबाद केले. 18 षटकाअखेर पाकची स्थिती 5 बाद 126 अशी होती. शान मसूद आणि शदाब खान यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. शान मसूदने 14 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 24 धावा जमविल्या. पाकच्या डावात 3 षटकार आणि 7 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे नसूम अहमद, शकीब अल हसन, मुस्तफिजूर रेहमान आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 8 बाद 127 (नजमूल हुसेन शांतो 54, सौम्या सरकार 20, दास 10, अफिफ हुसेन नाबाद 24, शाहिन आफ्रिदी 4-22, शदाब खान 2-30, हॅरीस रौफ 1-21, इफ्तिकार अहमद 1-15), पाक 18.1 षटकात 5 बाद 128 (मोहम्मद रिझवान 32, बाबर आझम 25, मोहम्मद नवाज 4, मोहम्मद हॅरीस 31, शान मसूद नाबाद 24, नसूम अहमद, शकीब अल हसन, मुस्तफिजूर रेहमान आणि इबादत हुसेन प्रत्येकी एक बळी).