वृत्तसंस्था/ लाहोर
पाक क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा याला खांदा दुखापत झाली असून या दुखापतीमुळे भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पीसीबीने अंतिम 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पाक संघाची निवड करण्याकरिता निवड समिती प्रमुख इंझमाम उल हकने नसीम शहाच्या जागी अनुभवी हसन अलीची निवड केली आहे. अलीकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात खेळताना 20 वर्षीय नसीम शहाला खांदा दुखापत झाली होती. त्यानंतर नसीम शहाला डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. नसीम शहा हा दुखापतीवर लवकरच शस्त्रक्रिया करून घेणार असून त्यानंतर त्याला पूर्ण तंदुरुस्त राहण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंझमाम उल हकने पाक संघाबरोबर जाणाऱ्या तीन राखीव खेळाडूंची नावे जाहीर केली असून यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहमद हॅरीस, फिरकी गोलंदाज अब्रार अहमद, आणि वेगवान गोलंदाज झमान खान हे राखीव खेळाडू म्हणून पाठवले जातील. निवडण्यात आलेल्या पाक संघातील सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असून पाक संघ निश्चितच चांगली कामगिरी करेल अशी आशा निवड समिती प्रमुख इंझमामने व्यक्त केली आहे. पाक संघात हसन अलीचे पुनरागमन झाले आहे. काही दिवसापूर्वी त्याच्या बोटाला दुखापत झाली होती या दुखापतीनंतर तो गेल्या जानेवारीपासून एकही सामना खेळलेला नाही. हसन अली हा अनुभवी गोलंदाज असल्याने त्याची या स्पर्धेसाठी निवड केली असल्याचे सांगण्यात आले.
भारतात सुरू होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकचा संघ दोन सरावाचे सामने खेळणार आहे. 29 सप्टेंबरला त्यांचा पहिला सरावाचा सामना न्यूझीलंडबरोबर तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर 3 ऑक्टोबरला होईल. पाक संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सबरोबर होणार आहे.
पाक संघ : बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), मोहमद रिझवान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, सौद शकील, फक्र झमान, हॅरीस रौफ, हसन अली, इफ्तिकार अहमद, मोहमद नवाज, मोहमद वासीम ज्युनियर, आगा सलमान, शाहिन आफ्रिदी आणि उस्मा मीर. राखीव खेळाडू- मोहमद हॅरीस, अब्dरार अहमद आणि झमान खान.