पालये : पालये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांची सर्वसाधारण सभा नुकतीच श्री भूमिका वेताळ देवस्थानच्या सभामंडपात होऊन यंदाच्या उत्सवासाठी अध्यक्षपदी योगेश बाबू पालयेकर यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष लाडू मोहन तिळवे, सचिव : साईनाथ लवू परब, उपसचिव : प्रकाश विश्वनाथ परब, खजिनदार : मच्छिंद्रनाथ अनंत परब, उपखजिनदार : राजन उत्तम तिळवे. आपली अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सभासदांचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश पालयेकर यांनी सभासदांचे आभार मानले. तसेच यंदाचा उत्सव यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, सभेच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष जयराम श्रीकृष्ण परब यांनी स्वागत केले. मावळते सचिव सागर तिळवे यांनी अहवाल सादर केला. तसेच मागील उत्सवाचा जमा-खर्चही यावेळी सादर करण्यात आला. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. मंडळ सरकारदरबारी नोंदणीकृत करण्यासंबंधीही चर्चा झाली. चर्चेत गोपाळ परब, गोविंद तिळवे, अनिल तिळवे, चंद्रकांत तिळवे, गोविंद नाईक, जितेंद्र तिळवे, प्रदीप तिळवे व अन्य सभासदांनी भाग घेतला. या सभेप्रसंगी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष जयराम श्रीकृष्ण परब, सचिव सागर चंद्रकांत तिळवे, खजिनदार सतीश सद्गुरु तिळवे, उपाध्यक्ष संदीप मनोहर न्हानजी, उपसचिव : शांती किशोर तिळवे, उपखजिनदार अशोक वासू गवंडी यांची उपस्थिती होती. यंदाची मूर्ती गणपत नाईक यांनी पुरस्कृत केली असून मूर्तिकार ज्ञानेश्वर विष्णू परब हे आहेत. गणेशमूर्तीची उंची अवाढव्य न करता ती 5 किंवा 6 फूट असावी. तसेच शाडू किंवा मातीची असावी, अशी सूचना गोविंद नाईक यांनी केली. गणेशभक्तांना आवश्यक त्यापद्धतीने ही मूर्ती बनविण्यात येईल, अशी माहिती यावेळी मूर्तिकलाकार ज्ञानेश्वर परब यांनी दिली. शेवटी जयराम परब यांनी आभार मानले. मागील उत्सव यशस्वीतेसाठी सहकार्य दिले त्या सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले.