मित्रांमधील परस्पर संबंध कसे असतात हे प्रत्येकाला माहीत आहे. मित्र हे जसे साहाय्यक असतात, किंवा आपण संकटात असताना आपल्यासाठी धावून येतात, तसेच ते अनेकदा आपली चेष्टा उडवून त्रासही देतात. अर्थात, जीवाभावाच्या मित्राने दिलेला त्रास कोणी मनावर घेत नाहीत, हा भाग निराळा.
अशीच दोन मित्रांची एक कथा सध्या सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय होत आहे. एका व्यक्तीने आपल्या मित्राला पोहताना उपयोग करण्याची पँट (आतील वस्त्र) भेट म्हणून दिली. त्याने ती परिधान करुन पोहण्यासाठी जलतरण तलावात प्रवेश केला. काहीवेळ पोहल्यानंतर त्याला काही वेगळीच जाणीव होऊ लागली. म्हणून त्याने आपल्या मांड्यांना स्पर्श केला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने परिधान केलेली पोहण्याची पँट गायब झाली होती. घट्ट बसलेली पँट अशी सुटून निघाली कशी असा विचार करत त्याने आजूबाजूला पाण्याच्या पृष्ठभागावर ती शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला कोठे दिसेना. त्याला पाण्याच्या बाहेरही येता येईना. कारण बाहेर त्यावेळी इतर माणसेही होती.
अखेर माणसांची गर्दी कमी झाल्यानंतर तो कसाबसा बाहेर आला. कोरडे कपडे घालून तो पँट कोठे गेली असेल याचा विचार करु लागला. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की पँट पाण्यात विरघळून गेली आहे. पाण्यात पडल्यानंतर काही वेळाने विरघळून जावेत अशा धाग्यांपासून ती बनविण्यात आली होती. मात्र, हा असा काही प्रकार असेल हे त्याच्या आधी लक्षात आले नव्हते. या मित्रांची नावे ग्रॅहॅम आणि डरेन अशी आहेत आणि ग्रॅहॅमने ही अनोखी भेट डरेनला दिली होती. सोशल मिडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच लोकप्रिय झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तो पाहताना हसून मुरकुंडी वळणे स्वाभाविकच आहे.