अनेक कलाकारांचा हृद्य सत्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
प्रतिनिधी /तिसवाडी
रायबंदर येथे झालेल्या एका सोहळय़ात पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळचा 16 वा वर्धापनदिन सोहळा श्री विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमानिशी आणि अनेक कलाकारांच्या हृद्य सत्काराने पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर, तर अध्यक्षस्थानी सुभाष कृ. नाईक उपस्थित होते. तसेच समाजसेवक तथा उद्योजक उत्पल मनोहर पर्रीकर, माजी सरपंच तथा पंच सदस्य निळकंठ भोमकर, समाजसेवक तथा नाटय़ कलाकार भालचंद्र उसगांवकर, श्री विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष सुदेश वळवईकर, पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संदीप नाईक आडपईकर, साईश आमोणकर, संदीप गणतप नाईक, सुदेश नाईक, महेंद्र बांदोडकर, मेघश्याम कुंकळेकर, प्रसिध्द रंगकर्मी तथा समाजसेवक हेमंत गोलतकर, भजनाचार्य सोमनाथबुवांचे सुपुत्र सुहास्य च्यारी, सुदन फडते यांची उपस्थिती होती.
यावेळी संपादक सागर जावडेकर म्हणाले की, भजनाचार्य पं. सोमनाथबुवांच्या योग्य मार्गदर्शनाने वावरणारे हे युवा भजनी पथक आज नवीन बाल पिढीसाठी अनेक उपक्रम आयोजित करीत आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. त्याचबरोबर सत्कार्याची दखल घेऊन बालकलाकारांचा यथोचित गौरव सोहळा आयोजन करून पुढील कार्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन करीत आहे. ही संस्था अखंडीतपणे 20 ते 25 वर्षे योग्यरित्या उपक्रम राबवित आहे. त्याकरीता या संस्थेला मानाचा मुजरा आहे. अशा संस्थांच्या पुढाकाराने आपली संस्कृती व परंपरा आजवर टिकून आहे.
यावेळी उत्पल पर्रीकर यांनी मंडळाच्या अशा सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन व आजवर अनेक कार्याची दखल घेऊन गौरोद्गार काढले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतरच्या कार्यक्रमात 2012 या वर्षात बाल भजनी मंडळाने शालेय भजन स्पर्धेत यश संपादन केलेल्या पानवेलकर भजनी मंडळातर्फे पिटू भक्तिचा डांगोरा हा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यात प्रमुख गायिका कलाकार कीर्ती कवळेकर, नताशा कुट्टिकर, श्रुती नाईक, साईली नाईक, उत्कर्षा कुट्टिकर, तेजस्वी कुट्टिकर, मनिषा कुंकळकर, शुभम नाईक, ऋषिकेश च्यारी, प्रणव रावळ या बालकलाकारांनी सहभाग घेतला. त्यांना साथसंगत पखवाज साईश नाईक व अविनाश कवळेकर यांनी व संवादनी साथ राजेंद्र काणकोणकर यांनी केली.
दुसऱया सत्रात संत कृपा झाली, इमारत फळा आली यात क्षेत्र पंढरपुर, आळंदी व देहु या तिर्थस्थनी भजन सेवा केलेल्या बालकलाकारांनी आपली भजन कला पेश केली. त्यात प्रमुख गायिका कु. प्रज्ञा रावळ, तेजस्वी कुट्टिकर, अस्मिता सं. नाईक, यशस्वी कुट्टिकर, आर्या आमोणकर, श्रृती नाईक यांनी अभंगवाणी सादर केली. तर कु. संयुक्ता नाईक, नताशा कुट्टिकर गवळणी सादर केल्या.
त्यानंतर कु. प्रज्ञा रावळ यांनी नाही केली तुझी सेवा देवराया हा अस्थाईचा अभंग विशेष शैलीत सादर केला तर शेवटी अपराध क्षमा केला पाहिजे, गुरू हा केला पाहिजे हा अभंग भैरवी स्वरूपात सादर करून या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता केली.
आयोजित जाहीर सत्कार सोहळय़ास व बालकलाकारांच्या गौरव सोहळय़ास प्रमुख पाहुणे तथा दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर, खास निमंत्रित पाहुणे म्हणून सुभाष नाईक, निळकंठ भोमकर, सुदेश वळवईकर, उद्योजक तथा कलाकार गजानन गोलतकर, भालचंद्र उसगांवकर, पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संदीप सत्यवान नाईक, संदीप ग. नाईक, सुदन फडते आदि मंडळी उपस्थित होती.
यावेळी सागर जावडेकर यांच्या हस्ते निवृत्त प्राचार्य उदय दत्ता नाईक, रंगकर्मी तथा समाज कार्यकर्ते हेमंत गोलतकर, ज्येष्ठ लोककलाकार सरोज उर्फ उज्वला सुदेश कुंडईकर व प्रसिध्द फॅशन डिझायनर सुवर्षा तुकाराम वेंगुर्लेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक तसेच माजी सरपंच निळकंठ भोमकर यांचीही भाषणे झाली. यावेळी सूत्रसंचालन सुदन फडते यांनी केले. पानवेलकर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदीप नाईक आडपईकर यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. आभार महेंद्र बांदोडकर यांनी मानले.