उद्या निवडणूक : आज भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उमेदवार निश्चित होणार
बेळगाव प्रतिनिधी
महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीसाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला असून महापौरपदाच्या रिंगणात चार नगरसेविका आणि उपमहापौर पदासाठी तीन नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने रविवारी भाजपच्या कार्यकरिणीची बैठक घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर उपमहापौर पदासाठी अपक्षमधून मराठी गटातील उमेदवार देण्यासाठी बैठका सुरू आहेत.
महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली आहे. त्यामुळे महापालिकेत 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. 10 नगरसेवक काँग्रेसचे आणि 13 नगरसेवक अपक्ष आहेत. सध्या महापौरपदासाठी भाजपमधून चार नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सारिका पाटील, सविता पाटील, दिपाली टोपली आणि वाणी जोशी यांचा समावेश आहे. तर उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी काही नगरसेविकांचा प्रयत्न सुरू आहे. पण आयकर रिटर्न फाईल केलेल्या नगरसेविकांना ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळणे अशक्य आहे. त्यामुळे उपमहापौरपदाच्या शर्यतीत तीन नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. मराठी भाषिक गटातील वैशाली भातकांडे या ओबीसी ‘ब’ आरक्षणानुसार निवडणूक लढवून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे उपमहापौर पदासाठी त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भाजपमधून शोभा सोमनाचे आणि अस्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपकडून महापौर-उपमहापौर पदासाठी कोणत्या नगरसेविकांची निवड करणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे त्या बैठकीत भाजपचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यादृष्टीने नियोजन करण्याकरिता अपक्ष नगरसेवकांनी बैठक आयोजित करून चर्चा केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत गटनेत्याची निवडदेखील होण्याची शक्यता आहे. सध्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी चर्चेला जोर आला आहे. 21 व्या कार्यकालावधीसाठी आणि चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थापन होणाऱ्या सभागृहातील महापौर-उपमहापौर कोण होणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.