पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले : ‘आप’चे राघव चड्ढा राज्यसभेतून निलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना संसदेतून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेत्यांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. याचदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांना राज्यसभेतून निलंबित केले आहे. ‘इंडिया’ खासदारांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर सभागृहाचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर दुपारी 1.30 वाजता विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात मोर्चा काढला. या निदर्शनात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा मुद्दा राज्यसभेत गाजला. राघव चड्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच खासदार संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत अधीर रंजन यांच्यासह तीनही खासदार निलंबित राहणार आहेत. दिल्ली सेवा विधेयकावर प्रस्तावित निवड समितीकरता बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप 5 खासदारांनी केल्यामुळे राघव चड्ढा अडचणीत सापडले आहेत. वायएसआर काँग्रेसच्या एका खासदाराचे नाव चड्ढा यांनी त्यांच्या सहमतीशिवाय प्रस्तावात सामील केले होते असा आरोप वायएसआर काँग्रेसचे खासदार विजय साई रे•ाr यांनी केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. हात जोडून सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे त्यांनी ‘कृपया माझा माईक बंद करू नका.’ अशी विनवणी केली. खर्गे बोलण्यासाठी उठताच सभापतींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, कार्यकाळ संपत असलेल्या खासदारांना सभागृहात निरोप देण्यात आला. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी निरोपपर भाषण केले.