नवव्या दिवशी भारताला 7 पदके, टेटे महिला दुहेरी, सांघिक स्केटिंग, लांबउडीमध्ये कांस्यपदके
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी नवव्या दिवशी भारताने सात पदके मिळविली, त्यात 3 रौप्य व 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या स्टीपलचेसमध्ये पारुल चौधरी, महिलांच्या लांब उडीमध्ये अन्सी सोजन इडापिल्ली व 4×400 मी. मिश्र रिलेमध्ये भारतीय खेळाडूंनी रौप्य मिळविले तर स्टीपलचेसमध्ये प्रीती, टेबल टेनिस महिला दुहेरीमध्ये सुतीर्था मुखर्जी-ऐहिका मुखर्जी, पुरुष व महिलांच्या सांघिक रोलर स्केटिंगमध्ये कांस्यपदके मिळविली.
महिलांच्या 3000 मे. स्टीपलचेसमध्ये पारुल चौधरीने 9:27.63 से. वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळविले. बहरिनच्या यावी विनफ्रेड मुटिलेने नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्ण तर भारताच्या प्रीतीने 9:43.32 सेकंद अवधी घेत बहरिनची आणखी एक धावपटू मेकोनेन टायजेस्ट गेटेंटला मागे टाकत तिसरे स्थान मिळविले. सुवर्ण मिळविणाऱ्या यावीने 9:15.31 सेकंदाचा नवा स्पर्धाविक्रम नोंदवताना तिचीच देशवासी जेबेत रुथचा 9:31.36 सेकंदाचा विक्रम मागे टाकला.
पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या अमलान बोर्गोहेनने 20.98 से. अवधी नोंदवत सहावे स्थान मिळविले. या प्रकाराचे सुवर्ण मिळविणाऱ्या जपानच्या कोकी उयेयामाने 20.60 सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याचाही हा नवा स्पर्धाविक्रम आहे. सौदी अरेबियाच्या मोहम्मद अब्दुल्लाह अबकरने (20.63 से.) रौप्य व चिनी तैपेईच्या यांग चुन हानने (20.74 से.) कांस्यपदक पटकावले.
लांब उडीत अॅन्सीला रौप्य
भारताची महिला अॅथलीट अॅन्सी सोजन इडापिल्लीने महिलांच्या लांब उडीमध्ये रौप्यपदक पटकावले. तिने पाचव्या प्रयत्नात 6.63 मी. लांब उडी घेत रौप्य निश्चित केले. तिची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. चीनच्या शिकी झियाँगने 6.73 मी. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्ण तर हाँगकाँगच्या एन्गा यानने 6.50 मी. लांब उडी घेत कांस्यपदक मिळविले. शैली सिंगला मात्र या प्रकारात पदकापर्यंत मजल मारता आली नाही. तिने 6.48 मी. अंतर नोंदवत पाचवे स्थान मिळविले.
4×400 मी. मिश्र रिलेमध्ये रौप्य
4×400 मी. मिश्र रिलेमध्ये भारताच्या मुहम्मद अजमल, विथ्या रामराज, रमेश राजेश व सुभा वेंकटेशन यांनी रौप्य मिळविले. लंकेच्या चौकडीने त्याने मागे टाकत दुसरे स्थान मिळविले होते. पण त्यांनी फाऊल केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि भारताला कांस्यऐवजी रौप्य मिळाले. भारतीय संघाने 3:14.34 से. वेळ नोंदवली. बहरिनच्या खेळाडूंनी 3:14.02 सेकंद अवधी घेत सुवर्ण, कझाकच्या खेळाडूंनी 3:24.85 से. अवधी घेत कांस्यपदक मिळविले.
सुतीर्था-ऐहिकाचे ऐतिहासिक कांस्य
टेबल टेनिसमध्ये भारताच्या सुतीर्था व ऐहिका यांनी महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावत ऐतिहासिक यश मिळविले. उपांत्य फेरीत त्यांनी उत्तर कोरियाच्या सुयोंग चा-सुगयला सुगयाँग पाक या जोडीविरुद्ध जबरदस्त खेळ केला पण अखेर त्यांना ही लढत 3-4 (11-7, 8-11, 11-7, 8-11, 9-11, 11-5, 2-11) अशा निसटत्या फरकाने गमवावी लागली. आधीच्या फेरीत भारतीय जोडीने चीनच्या वर्ल्ड चॅम्पियन जोडीवर मात करून सनसनाटी निर्माण केली होती. महिला दुहेरीत भारताने मिळविलेले हे पहिलेच पदक आहे. 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुष संघ व मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी कांस्यपदक मिळविले होते.
रोलर स्केटिंगमध्ये दोन सांघिक कांस्य
भारताच्या रोलर स्केटर्सनी सांघिक 3000 मी. रिलेमध्ये दोन कांस्यपदके मिळविली. संजना बथुला, कार्तिका जगदीश्वरन, हीरल साधू, आरती कस्तुरी राज या भारतीय महिला संघाने 4:34.861 से. अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. चिनी तैपेईच्या चौकडीने (4:18.447 से.) सुवर्ण व दक्षिण कोरिया संघाने (4:21.146 से.) रौप्यपदक पटकावले. त्यानंतर आर्यनपाल सिंग घुमान, आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत कांबळे व विक्रम इंगळे या पुरुष संघाने 4:10.128 से. वेळ नोंदवत कांस्य मिळविले. चिनी तैपेईने (4:05.692 से.) सुवर्ण, दक्षिण कोरियाने (4:05.702 से.) रौप्यपदक मिळविले. यापूर्वी 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेतही भारताच्या पुरुष स्केटिंग संघाने फ्री स्केटिंग व पेअर्स स्केटिंगमध्ये दोन कांस्यपदके मिळविली होती