दिल्ली उच्च न्यायालयात प्रदीर्घ कायदेशीर लढाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना 10 वर्षांच्या वैधतेचा नवीन पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर मेहबुबा यांना पासपोर्ट देण्यात आला. त्यांच्या पासपोर्टची मुदत 2019 मध्ये संपल्यानंतर त्यांनी नुतनीकरणासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तीन वर्षांनंतर म्हणजेच जून-2023 मध्ये त्यांना नवा पासपोर्ट मिळाला आहे.
मेहबुबा मुफ्ती यांना दिलेला पासपोर्ट 1 जून 2023 ते 31 मे 2033 पर्यंत वैध आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यावषी मार्चमध्ये पासपोर्ट प्राधिकरणाला पीडीपी प्रमुखांना नवीन प्रवास दस्तऐवज जारी करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्यास सांगितले होते. न्यायालयीन सुनावणीच्या विळख्यात अडकलेला त्यांच्या पासपोर्टचा मुद्दा न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंडपीठाने मार्चमध्ये निकालात काढला होता. मुफ्ती यांच्या पासपोर्टबाबत संबंधित पासपोर्ट अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांत त्वरीत निर्णय घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले होते.
नवीन पासपोर्ट जारी करण्यासंदर्भातील मुफ्ती यांच्या अपीलावर त्वरित निर्णय घेण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या मेहबुबा यांच्या याचिकेवर न्यायालयाचा आदेश आल्यानंतर तीन महिन्यांनी नवा पासपोर्ट मिळाला आहे. मुफ्ती यांच्या याचिकेवरील आदेश 2 मार्च रोजी पारित करण्यात आला होता. यावषी फेब्रुवारीमध्ये मेहबुबा यांनी पासपोर्ट जारी करण्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही चर्चा केली होती.