बियाट्रिझ माइया, कोको गॉफ, जेबॉर, अलेक्झांडर व्हेरेव्ह चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
2021 मध्ये उपविजेतेपद मिळविणाऱ्या अॅनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हाने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचे आव्हान संपुष्टात आणले. सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याशिवाय चौदाव्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइया, अमेरिकेची कोको गॉफ, ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांनी चौथी फेरी गाठली.
रशियाच्या पावल्युचेन्कोव्हाने 28 व्या मानांकित एलिस मर्टेन्सवर 3-6, 7-6 (7-3), 6-3 अशी कडव्या संघर्षानंतर मात करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. पहिला सेट गमविल्यानंतरही तिने जोरदार मुसंडी मारत विजय मिळविला. गुडघ्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर ती क्रमवारीत 333 व्या क्रमांकावर घसरली आहे. ती आता 2017 नंतर ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सर्वात खालचे मानांकन असलेली खेळाडू बनली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत कॅरोलिना मुचोव्हा किंवा इलिना अॅव्हानेसियन यापैकी एकीशी होईल.
चौदाव्या मानांकित ब्राझीलच्या बियाट्रिझ माइयाने एका सेटची पिछाडी भरून काढत 23 व्या मानांकित एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाचा 5-7, 6-4, 7-5 असा पराभव करून चौथी फेरी गाठली. ही लढत 2 तास 48 मिनिटे रंगली होती. यापूर्वी 1979 मध्ये पॅट्रिसिया मेद्रादोने या स्पर्धेची चौथी फेरी गाठली होती. त्यानंतर ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठणारी माइया ही पहिली ब्राझीलियन महिला ठरली आहे. तिची पुढील लढत सारा सोरिबेस टोर्मोशी होईल. टोर्मोला रीबाकिनाने माघार घेतल्यामुळे चौथ्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. अलेक्झांड्रोव्हा याआधी ग्रँडस्लॅममध्ये पाचही वेळा तिसऱ्या फेरीत पराभूत झाली आहे.
सहाव्या मानांकित कोको गॉफनेही एका सेटची पिछाडी भरून काढत पात्रता फेरीतून आलेल्या मिरा अँड्रीव्हाचा 6-7 (5-7), 6-1, 6-1 असा पराभव करीत आगेकूच केली. तिची पुढील लढत बिगरमानांकित अॅना कॅरोलिना श्मीडलोव्हाशी होईल. श्मीडलोव्हाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठताना कायला डे हिचा 6-1, 6-3 असा पराभव केला. जागतिक चौथ्या मानांकित ट्युनिशियाच्या जेबॉरनेही चौथी फेरी गाठली असून तिने सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोविचवर 4-6, 6-4, 6-2 अशी मात केली. तिची पुढील लढत बर्नार्डा पेराशी होईल.
जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत
पुरुष एकेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोचा चार सेट्सच्या झुंजीत 3-6, 7-6 (7-3), 6-1, 7-6 (7-5) असा पराभव करीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. माजी अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने विक्रमी 17 व्या वेळी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना पेरूच्या जुआन पाब्लो व्हेरिलासचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. त्याची पुढील लढत रशियाच्या अकराव्या मानांकित कॅरेन खचानोव्हशी होईल
महिला दुहेरीची जोडी अपात्र
जपानची मियू काटो व तिची इंडोनेशियन साथीदार अल्डिला सुत्जियादी यांना प्रेंच ओपन महिला दुहेरीतून अपात्र ठरविण्यात आले. तिसऱ्या फेरीत त्यांची लढत झेकची मेरी बुझकोव्हा व स्पेनची सारा सोरिबेस टोर्मो यांच्याशी सुरू असताना काटोने अनवधानाने मारलेला चेंडू कोर्टवरील बॉलगर्लला लागल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. काटोने हेतुपूर्वक चेंडू मारला नव्हता हे लक्षात घेत पंचांनी प्रथम तिला ताकीद दिली होती. पण प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. चेंडू लागलेली बॉलगर्लही त्यावेळी रडत होती. तक्रारीनंतर पंचांनी तिच्या जवळ जाऊन तिची पाहणी केली. ती रडत होती आणि थोडेसे रक्तही आल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी काटो-सुत्जियादी यांना अपात्र ठरवित बुझकोव्हा व टोर्मो यांना पुढे चाल मिळाली. यावेळी बुझकोव्हा-टोर्मो जोडी 7-6 (7-1), 1-3 असे एका सेटने पुढे होती.