कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पावसाअभावी राज्यातील 195 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागात मोठी समस्या निर्माण होणार आहे. यासाठी राज्य सरकारने रोजगार हमी योजना त्वरित सुरू करावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांसाठी भारत कम्युनिस्ट पक्ष बेळगाव विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील 13 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. बेळगाव व खानापूरला वगळण्यात आले आहे. या तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून त्या तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे. शेतकऱ्यांना तत्काळ पीकहानी देण्यात यावी. मान्सून पावसाला विलंबाने सुऊवात झाल्याने पावसावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी विविध पिके घेतली आहेत. मात्र पावसाअभावी ही पिके करपून जात आहेत. याची त्वरित दखल घेण्यात यावी, उद्योग नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहराकडे वळत आहे. भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता असून सरकारने आतापासूनच ग्रामीण भागातील जनतेसाठी 150 दिवस रोजगार हमी योजनेतून काम द्यावे. यामुळे शहराकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी होईल.
महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज
महागाई नियंत्रणात आणावी, पिकांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, गरीब शेतकरी आणि कुली कामगार स्त्राr संघटनांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, पुढील वर्षात शेतकऱ्यांना मोफत बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देण्यात यावीत, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करण्यात यावेत, अन्नधान्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महागाई वाढविण्यात येत आहे. यावर नियंत्रण ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिरस्तेदार एस. एम. परगी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यदर्शी जी. एम. जैनेखान, जी. व्ही. कुलकर्णी, नागाप्पा संगोळ्ळी, मंदा नेवगी, एल. एस. नायक, दिलीप वारके आदी उपस्थित होते.