आमदार दिगंबर कामत यांचे मडगावातील व्यापारी, आस्थापनांच्या मालकांना आवाहन
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील व्यापारी व आस्थापनांच्या मालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मडगाव पालिकेची कर थकबाकी भरावी, असे आवाहन आमदार दिगंबर कामत यांनी केले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई झाल्यास त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कालकोंडा, मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरानजीकच्या जुन्या सुलभ शौचालयाची दुरुस्ती करून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याचे शुक्रवारी सकाळी आमदार कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यांत आले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ व अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
नगराध्यक्ष शिरोडकर यांनी कर वसुलीसाठी खास मोहीम राबवून 12 दिवसांत सुमारे 26 लाखांची वसुली केल्याबद्दल कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. पालिकेने यापुढे जोमाने ही मोहीम राबवावी. लोकांनी त्यांना सहकार्य करून करभरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणाला सर्व रक्कम एकदाच भरणे शक्य होत नसल्यास 50 टक्के रक्कम आधी घेऊन उर्वरित रक्कम नंतर भरण्याची मुभा द्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी पालिकेला केली.
व्यापार परवाना घ्या, अन्यथा कारवाई
ज्या लोकांनी व्यापार परवान्याविना दुकाने, आस्थापने थाटली आहेत त्यांनी आपणहून पुढे येऊन परवाना घ्यावा अन्यथा कारवाईला तयार राहावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पालिकेने यापुढे 31 मार्चपूर्वी करभरणा करण्यासाठी नोटिसा जारी कराव्यात व लोक 30 एप्रिलपर्यंत आगावू वर्षाचा कर चुकता करतील याची खातरजमा करावी, अशी सूचना कामत यांनी केली. पूर्वी वेळेवर नोटिसा जारी केल्या जात होत्या. अलीकडच्या वर्षांमध्ये ही प्रक्रिया बंद पडली असून पालिकेने त्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतच्या अंतर्गत सर्व घरांना शौचालय असावे यावर भर दिला आहे. जर घरात शौचालय नसेल, तर सुलभ शौचालयाची व्यवस्था जाग्यावर घालण्याचे आदेश दिलेले आहेत. आपण विधानसभेत मडगावातील सर्व सुलभ शौचालयांचे सुशोभिकरण व तेथील सुविधा जाग्यावर घालण्यासाठी मंजुरी मिळविली होती. त्यातून प्रथम सहा ठिकाणच्या सुलभ शौचालयांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले होते. त्यातील कालकोंडा येथील सुलभ शौचालय तयार झाल्याने त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे, असे कामत यांनी सांगितले. सुमारे 15 लाख या सुशोभिकरण व दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत.