प्रतिनिधी / म्हापसा
बुधवारी कळंगूट येथील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये मतपत्रिकेवर चिन्हाची अदलाबदल झाल्यावर मतदारांनी हे उमेदवार व निर्वाचन अधिकाऱयांच्या नजरेस आणून दिल्यावर कळंगूट सरकारी प्राथमिक शाळा सावतावाडा येथे होणारी निवडणूक निवडणूक आयुक्त मूर्ती यांच्या आदेशावरून रद्द करण्यात आली होती व ती निवडणूक गुरुवारी पुन्हा घेण्यात आली असता मतदारांनी उत्साहाने मतदान केले. कळंगुटच्या वॉर्ड 9 मध्ये 75.47 टक्के मतदान झाले.
वरुणराजाची कृपादृष्टीही या मतदानास महत्त्वाची ठरली. सकाळपासूनच उमेदवार मुन्ना कळंगुटकर, माही सिमेपुरुषकर, दिनेश सिमेपुरुषकर, स्वप्नेश वायंगणकर आदी उमेदवार मतदानावर उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. सकाळी 9 वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदार कमी प्रमाणात होते मात्र 10 नंतर सर्व मतदार हळूहळू मतदानासाठी बाहेर पडताना पहायला मिळाले. विशेष म्हणजे अपंग व्यक्तीनीही मतदान केंद्रात येऊन मतदान केले.
टुगेदर फॉर कळंगूट पॅनलचे प्रमुख शॉन मार्टीन्स यांनी निवडणूक आयुक्तानी ही निवडणूक प्रक्रिया दुसऱया दिवशी म्हणजे गुरुवारी मतदान ठेवल्याने आभार व्यक्त करीत कळंगुटच्या विकासासाठी मतदार मतदान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिनेश सुमेपुरुषकर म्हणाले की, आम्ही पाच वर्षात गावात विकास साधला आहे. गावात सर्व सोयी सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे त्या जोरावर नागरिक आपल्यास मतदान करणार असल्याचे ते म्हणाले.
उमेदवार माही सिमेपुरुषकर म्हणाल्या की, कळंगूट वासियांना बदल घडवून आणायचा आहे. गावचा विकास आणि कळंगुटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नागरिक आपल्यास मतदान करणार आहे. मुन्ना कळंगुटकरने कळंगुटच्या विकासासाठी मतदार घराबाहेर पडत असल्याचे सांगून कळंगुटमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदार आपल्यास मतदान करणार असल्याचे सांगितले.
राज्यात नारळी पोर्णिमा असूनही सकाळपासून मतदान केंद्रावर पुरुषाबरोबर महिलानीही मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावली होती. सायं. 5 वा. वेळेनुसार निवडणूक अधिकाऱयांनी शाळेची मुख्य गेट मतदानासाठी बंद केल्याने उशीरा आलेल्या मतदारांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. साय. 5 वाजेपर्यंत 952 मतदारांपैकी 752 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकंदर परिस्थिती पाहता मतदान शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडले. पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.