सातारा / प्रतिनिधी :
कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद येथे राहत असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा रस्ता ओलांडताना एसटीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना वाई तालुक्यातील वेळे येथे महामार्गावर घडली. नारायण नामदेव जगताप असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायण जगताप हे सोमवार दि. 12 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील वेळे येथून पायी चालले होते. या दरम्यान, रस्ता ओलांडताना पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली. याची माहिती तात्काळ भुईंज पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अजून महिती घेण्याचे काम सुरु असल्याचे भुईंज पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.