वृत्तसंस्था/ गुडालजेरा (मेक्सिको)
डब्ल्यटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या गुडालजेरा खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या 1000 दर्जाच्या स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविताना ग्रीसच्या मारिया सॅकेरीचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित पेगुलाने चौथ्या मानांकित सॅकेरीचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी मानांकनातील पहिल्या 10 खेळाडूंमध्ये ही लढत अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. पण पेगुलाने आपल्या अचूक सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर सॅकेरीचे आव्हान केवळ 70 मिनिटांच्या कालावधीत संपुष्टात आणले. पेगुलाने डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये पावसाचा अडथळा आल्याने काही सामने उशिरा खेळविले गेले. त्यामुळे ग्रीसच्या सॅकेरीला एकाच दिवसामध्ये दोन सामने खेळावे लागले होते.