अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : अलेक्झांड्रोव्हा, मिनेन, अल्कारेझ, सिनर, रुबलेव्ह, व्हेरेव्ह, वावरिंकाही विजयी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेची नंबर वन खेळाडू जेसिका पेगुला, युक्रेनची एलिना स्विटोलिना, ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर, एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा, बेल्जियमची पात्रता फेरीतून आलेली ग्रीट मिनेन, पात्रता फेरीतूनच आलेल्या वांग यफान, विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा वोन्ड्रूसोव्हा, जागतिक द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्का यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्र्रवेश केला. पुरुषांमध्ये विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ, इटलीचा यानिक सिनर, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, आंद्रे रुबलेव्ह, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, स्विसचा स्टॅन वावरिंका, अँडी मरे यांनीही दुसरी फेरी गाठली. अमेरिकेची व्हीनस विल्यम्स, कॅरोलिन गार्सिया यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
महिला एकेरीत अमेरिकेच्या पेगुलाने कॅमिला जॉर्जीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. सुमारे दीड तासात तिने हा सामना संपवला. युक्रेनच्या स्विटोलिनाने दुसरी फेरी गाठताना जर्मनीच्या अॅना लेना फ्रीडसमचा 6-3, 6-1 असा केवळ 58 मिनिटांत पराभव केला. पेगुला व स्विटोलिना यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला तर तिसऱ्या फेरीत दोघींची एकमेकाविरुद्ध लढत होईल. अन्य एका सामन्यात जेबॉरला कॅमिला ओसोरिओवर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने ही लढत 7-5, 7-6 (7-4) अशी जिंकली. एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाने लैला फर्नांडेझचे आव्हान तीन तासांच्या लढतीत 7-6 (7-4), 5-7, 6-4 असे संपुष्टात आणले. अलेक्झांड्रोव्हाची पुढील लढत लेसिया त्सुरेन्कोशी होईल.
व्हीनस, गार्सिया पराभूत
पात्रता फेरीतून आलेल्या बेल्जियमच्या ग्रीट मिनेनने दोन वेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्सचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. कारकिर्दीत 24 व्या वेळी व्हीनस या स्पर्धेततील शंभरावा सामना खेळत होती. सुमारे सव्वातास ही लढत चालली होती. पात्रता फेरीतून आलेली आणखी एक खेळाडू वांग यफानने या स्पर्धेत पुनरागमन करताना विजय मिळविला. तिने सातव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाला 6-4, 6-1 असे चकित केले. विम्बल्डन विजेत्या वोन्ड्रूसोव्हाने दुसरी फेरी गाठताना नवव्या मानांकित हॅन ना लेईचा 6-3, 6-0 असा पराभव केला. तिची पुढील लढत मार्टिना ट्रेव्हिसनशी होईल. ट्रेव्हिसनने युलिया पुतिनत्सेव्हावर 0-6, 7-6 (7-0), 7-6 (10-8) अशी मात केली. जागतिक द्वितीय मानांकित साबालेन्काने दुसरी फेरी गाठताना मेरिना झानेवस्कावर 6-3, 6-2 अशी मात केली. बेल्जियमच्या झानेवस्काचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे तिने आधीच जाहीर केले होते. साबालेन्काची पुढील लढत ब्रिटनच्या जोडी बरेजशी होईल.
मेदवेदेव्ह, सिनर, मरे, व्हेरेव्ह विजयी
पुरुष एकेरीत विद्यमान विजेत्या व अग्रमानांकित अल्कारेझने दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याचा प्रतिस्पर्धी डॉमिनिक कोएफरने दुसऱ्या सेटमधून दुखापतीमुळे माघार घेतल्याने कार्लोसला पुढे चाल मिळाली. यावेळी तो 6-2, 3-2 असे आघाडीवर होता. अल्कारेझची दुसरी लढत द.आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसशी होईल. अन्य एका सामन्यात इटलीच्या सिनरने जर्मनीच्या यानिक हान्फमनवर 6-3, 6-1, 6-1 अशी मात केली. तिसऱ्या मानांकित मेदवेदेव्हनेही आगेकूच करताना अॅटिला बॅलेझचा 6-1, 6-1, 6-0 असा केवळ सव्वा तासात फडशा पाडला. मेदवेदेव्हचाच देशवासी आंद्रे रुबलेव्हने फ्रान्सच्या ऑर्थर कॅझॉवर 6-4, 7-6 (7-5), 6-1 अशी मात केली तर अलेक्झांडर व्हेरेव्हने अलेक्सांडर वुकिचवर 6-4, 6-4, 6-4 असा विजय मिळविला. तसेच 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या 38 वर्षीय वावरिंकाने जपानच्या योशिहितो निशिओकाचा 7-6, (7-5), 6-2, 6-4 असा पराभव केला. 1992 नंतर या स्पर्धेत सामना जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला. त्यावर्षी जिमी कॉनर्सने सामना जिंकला तेव्हा तो 40 वर्षांचा होता. ब्रिटनच्या अँडी मरेलाही विजय मिळविण्यासाठी तीन तास संघर्ष करावा लागला. त्याने कोरेन्टिन मुटेटवर 6-2, 7-5, 6-3 अशी मात केली.