19 हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे पेन्शन थांबली
बेळगाव : मागील काही महिन्यांपासून पेन्शन थांबलेल्या अंध, दिव्यांग, निराधार लाभार्थ्यांनी तातडीने बँक खात्याशी आधार लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार सिद्राय भोसगी यांनी केले आहे. बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या पेन्शन थांबल्या आहेत. अशा लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आधार लिंक करावेत, अन्यथा पेन्शन बंद केली जाईल, असा इशारादेखील तहसीलदारांनी दिला आहे. शासनाकडून अंध, दिव्यांग, विधवा, वयोवद्ध, निराधारांना मासिक पेन्शन दिली जाते. आर्थिक साहाय्य व्हावे या दृष्टिकोनातून ही पेन्शन दिली जाते. मात्र मागील काही महिन्यांपासून पेन्शन थांबल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. शिवाय पेन्शन का थांबली, याबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र तहसीलदारांनी बँक खात्याला आधारकार्ड लिंक नसल्यामुळे पेन्शन थांबल्या आहेत. तरी लाभार्थ्यांनी आधार लिंक करून पेन्शन पूर्ववत सुरू करून घ्यावी, असे आवाहनदेखील केले आहे. बेळगाव तालुक्यात 56 हजारहून अधिक पेन्शनधारक आहेत. त्यामध्ये दिव्यांग, विधवा, निराधार, अंध, वयोवृद्धांचा समावेश आहे. मात्र यापैकी बहुतांशी लाभार्थ्यांची पेन्शन थांबली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात गरजा भागविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळेच पेन्शन थांबल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. पेन्शन थांबलेल्या सर्व लाभार्थ्यांनी तातडीने आधार लिंक करावे, असेही कळविण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांची पेन्शन पोस्ट खात्यात तर काही लाभार्थ्यांची पेन्शन बँक खात्यात जमा होते. लाभार्थ्यांनी पोस्ट खात्यात आणि बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांना जागृतीबाबत सूचना
मागील काही महिन्यांपासून पेन्शन थांबल्याने तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्या लाभार्थी झिजवत आहेत. मात्र लाभार्थ्यांना पेन्शन कशासाठी थांबली, याचे उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे लाभार्थ्यांची ससेहोलपट सुरू होती. अखेर शुक्रवारी तहसीलदार सिद्राय भोसगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पेन्शनबाबत चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना याबाबत जागृती करण्याच्या सूचना केल्या.
1 ऑगस्टपूर्वी आधार लिंक करण्याचे आवाहन
19 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी केली नसल्यामुळे पेन्शन थांबली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक करून ई-केवायसी करावी. त्यानंतर पेन्शन पूर्ववत सुरू होईल. पेन्शन बंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आधारकार्ड लिंक करावेत.
– सिद्राय भोसगी (तहसीलदार, बेळगाव)