गॅस पाईपलाईनसाठीच्या खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा खंडित
वास्को : वास्को चिखलीतील महामार्गाच्या बाजूला खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्याने मागचे तीन दिवस चिखली पंचायत क्षेत्रातील काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या समस्येने स्थानिक नागरिक संतप्त झालेले असून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे. अदानी गॅस प्रा.लि. च्या कर्मचाऱ्यांवर स्थानिक नागरीकांनी निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.b चिखलीतील पंचायत मैदानाच्या कुंपणाला लागूनच महामार्गावर गॅसवाहिनी जोडण्यासाठी खोदण्यात येत असताना जलवाहिनी आणि वीजवाहिनी तोडण्याचा प्रकार घडलेला असून वीजवाहिनी जोडण्याचे पूर्ण झालेले असले तरी जलवाहिनी जोडण्यात आलेली नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक पंच मारी मास्कारेन्हास व इतर पंचांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या कंपनीकडून कुणालाही विश्वासात न घेता कामे करण्यात येत असून त्यांच्या बेजबाबदारीचा फटका स्थानिक लोकांना बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चिखली गावातील बऱ्याच प्रभागांमध्ये मागच्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. मागच्या वर्षी वास्को शहरातही अशाच प्रकारे वीजवाहिन्या आणि जलवाहिन्याही तोडण्याचा प्रकार गॅसवाहिनी जोडण्याचे काम चालू असताना घडला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. सध्या असाच त्रस्त प्रकार चिखलीतही सुरू आहे. जलवाहिनी त्वरित जोडून गावातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास महामार्ग रोखू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळी दिला.