प्रतिनिधी/ मडगाव
मडगावमध्ये सणाच्या शुभेच्छा देणारे राजकीय नेत्यांचे फलक-होर्डिंग्ज पुन्हा दिवाळीनिमित्त झळकले असल्याने शॅडो कौन्सिल फॉर मडगावने या शेकडो फलक-होर्डिंग्ससाठी पालिकेने दिलेल्या परवानग्या आणि त्यांच्याकडून वसूल केलेला कर यांचा तपशील मागितला आहे. पालिकेच्या 35 कोटींच्या थकबाकीविषयी चिंता व्यक्त करताना शॅडो कौन्सिलने, लोकप्रतिनिधींनी फलक-होर्डिंग्ज यांच्या प्रदर्शनासाठी लागू असलेले शुल्क भरून आदर्श घालून दिला पाहिजे, असे म्हटले आहे.
आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी म्हटले आहे. मागील कार्यकाळातही आम्ही हा मुद्दा उचलून धरला होता आणि तेव्हाच्या नगरसेवकांनी आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असले, तरी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही थकबाकी राहिली नसल्याचे प्रमाणपत्र मिळू न शकल्याने तेव्हा कर भरावा लागला होता, याची त्यांनी आठवण करून दिली.
मडगावातील राजकीय प्रतिनिधींनी लावलेल्या सर्व अनधिकृत फलक-होर्डिंग्जसाठी मुख्याधिकाऱयांनी त्यांना दंड ठोठावावा ही आमची मागणी आहे. तरच त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. कोणताही धार्मिक सण असो, लोकांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींना व अन्य राजकीय नेत्यांना या फलक-होर्डिंग्जच्या माध्यमातून स्वतःच्या जाहिराती करण्यात अधिक रस असतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
पालिकेने आपली थकबाकी वसूल करण्यासाठी सामान्य नागरिकांचे दरवाजे ठोठावले आहेत. अशा वेळी आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वतःच्या फलक-होर्डिंग्जवर लागू होणारा कर भरून आदर्श ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आम्हाला योग्य वाटते. आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींनी लावलेल्या सर्व फलक-होर्डिंग्जच्या छायाचित्रांद्वारे कागदोपत्री पुरावे गोळा केले आहेत आणि त्यांच्याकडून दंडासह थकबाकी वसूल होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.