कुडाळ – वार्ताहर
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या या जगात व सतत मोबाईल मध्ये अडकून पडलेल्या युवाईला कुठेतरी आपली संस्कृती, मराठी संस्कार यांचा काहीसा विसर पडत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सिंधुदुर्गचा राजा गणपतीच्या मंडपात सुलेखनकार सुमित सुधाकर दाभोलकर यांनी साकारलेले ‘मनाचे श्लोक’ आकर्षित करीत आहेत.सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. येथील पोस्ट कार्यालयानजीक ‘सिंधुदुर्ग राजा’ गणपतीची यावर्षी 17 दिवसासाठी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात या गणपतीकडे साकारलेले मनाचे श्लोक आकर्षित करीत आहेत.सजावटी साठी थर्माकॉलचा वापर न करता कापड व कागद यांचा वापर केला आहे.
लाईट्स, साउंड सिस्टीम, रंगमंच बांधणी एकंदरीत गणपती बाप्पाच्या या मंडपाचे पूर्ण काम चिन्मय नेमळेकर व सहकाऱ्यांनी पूर्ण केले. धकाधकीच्या या दैनंदिन जीवनात आपण सायंकाळी शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक या गोष्टी पठण करायचे विसरून जात आहोत. याचीच आठवण करीत सुमित दाभोलकर याने आपली कला जोपासत कॅलिग्राफी (सुलेखन) च्या माध्यमातून श्री समर्थ रामदासकृत मनाचे श्लोक ची 24 कडवी साकारली आहेत. त्याला विनीत सामंत याची साथ मिळाली.ही कलाकृती साकारताना त्यांना राकेश नेमळेकर, अनुप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या अभिनव संकल्पना लक्षवेधी व प्रेरणादायी ठरत आहे.सदर कलाकृतीतून एक चांगला वैचारिक व सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.यावर्षी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानने आपली सस्कृती जपणारा हा एक स्तुत्य असा उपक्रम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविला आहे.या उपक्रमाचे कौतुक होत आहे.